राजधानी दिल्लीतील घटना सार्वभौमत्वावर हल्ला!

0

 

लोकशाही विशेष लेख

भारताची राजधानी असलेल्या दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी भीषण आत्मघाती हल्ला झाला. एका मोटारीत झालेल्या भीषण स्फोटाने केवळ राजधानीच नव्हे तर संपूर्ण देश हादरला. या भीषण स्फोटात १३ निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला तर २५ हून अधिक नागरिक जबर जखमी झाले. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात हाय ॲलर्ट घोषित करण्यात आला. केंद सरकारने या भ्याड हल्ल्याचा तपास एनआयएकडे सोपवला आहे. एनआयए या हल्ल्याचा योग्य तपास करून यामागे कोण आहे हे शोधून काढतीलच पण हा हल्ला पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी घडवला हे शाळकरी मुलेही सांगू शकेल.

मागील काही वर्षापासून शांत असणारे दहशतवादी पुन्हा सक्रिय झाले आहेत हेच या हल्ल्यातून स्पष्ट होते. भारतात दहशतवादी कारवाया करून निष्पाप नागरिकांना टार्गेट करायचे आणि देशात अशांतता माजवायची त्यातूनच देशात धार्मिक दंगली घडवून देशात अराजकता माजवण्याचा दहशतवाद्यांचा मनसुबा आहे. भारतासोबत समरोसमोर युद्ध करून आपण जिंकू शकू नाहीत हे पाकिस्तानला ऑपरेशन सिन्दुर नंतर समजले असेल म्हणूनच त्यांनी पुन्हा एकदा आपला जुना पॅटर्न वापरायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी दहशतवाद्यांना पुन्हा सक्रिय केले. या हल्ल्याच्या आदल्या दिवशीच तीन शहरांमध्ये रासायनिक हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा महाभयानक कट पोलिसांनी उघडकीस आणला. गुजरात पोलिसांच्या कारवाईपाठोपाठ जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांचे जाळे उद्ध्वस्त करून सात जणांना अटक केली. हरियाणातील फरीदाबरमधून तब्बल तीन हजार किलो आरडीएक्स हस्तगत केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

सुरक्षा यंत्रणेचे याबाबत कौतुकच करायला हवे. जर ही स्फोटके सापडली नसती आणि दहशतवाद्यांचे मनसुबे यशस्वी झाले असते तर देशात हाहाकार उडाला असता. हरियाणा, जम्मू काश्मीर प्रमाणे दिल्लीतील स्फोट मात्र सुरक्षा यंत्रणेला रोखता आला नाही त्यामुळे निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला. २०११ नंतर पहिल्यांदाच दिल्लीत इतका भीषण हल्ला झाला. हा हल्ला म्हणजे भारतीय सार्वभौमत्वावर केलेला हल्ला आहे म्हणूनच याचा बदला घ्यायला हवा. भारताने या हल्ल्याचा बदला घेऊन दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर द्यायला हवे. काही महिन्यांपूर्वी दहशतवाद्यांनी पहलगाम येथे अशाच प्रकारे निष्पाप नागरिकांना टार्गेट करून जीवे मारले. त्यानंतर भारताने पाकिस्तामात घुसून दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त केली आणि १०० हून अधिक दहशतवाद्यांना ढगात पाठवले. कदाचित त्यामुळेच चवताळलेल्या दहशतवाद्यांनी देशात दहशतवादी कारवायांना सुरुवात केली असेल. अर्थात दहशतवाद्यांना याचीही शिक्षा मिळणार यात शंका नाही.

ऑपरेशन सिन्दुर राबवून भारतीय सैन्याने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला भविष्यात ऑपरेशन सिन्दुर पार्ट २ राबवून दिल्ली हल्ल्याचाही बदला घेतला जाईल. सरकार त्यांचे काम करेलच पण आता नागरिकांचीही जबाबदारी वाढली आहे. आपल्या शहरात, परिसरात काही संशयास्पद गोष्टी घडत असल्याची शंका जरी नागरिकांना आली तरी नागरिकांनी पोलिसांना त्याची माहिती द्यावी. दहशतवाद्यांचे स्लीपर सेल शहाराशहरात अस्तित्वात असण्याची शक्यता आहे. जर अशाप्रकारे कोणता व्यक्ती किंवा संघटना संशपस्पद कृत्य करताना आढळले तर त्याची सूचना पोलिसांना द्यावी. कोणत्याही बेवारस वस्तूंना हात लावू नये. बेवारस वस्तू जर आढळल्या तर त्याचीही सूचना पोलिसांना द्यावी. नागरिकांनी सतर्क राहिल्यास दहशतवाद्यांचे मनसुबे सफल होणार नाहीत. दहशतवादी म्हणजे माणुसकीचे शत्रू आहेत. माणुसकीच्या शत्रूंना नामोहरण करण्याची जबाबदारी जितकी सरकारची आहे तितकीच नागरिकांचीही आहे.

श्याम ठाणेदार,
दौंड जिल्हा पुणे
मो. ९९२२५४६२९५

Leave A Reply

Your email address will not be published.