लोकशाही न्यूज नेटवर्क

ड्रग्ज तस्करीच्या एका प्रकरणात मुंबई पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. कॉन्स्टेबल किरण इंदुलकर असे त्याचे नाव आहे. मालवणी पोलिसांनी ड्रग्ज विक्री करताना किरण इंदुलकर याला रंगेहाथ पकडले आहे.
किरण इंदुलकर हा सध्या जोगेश्वरी पोलीस ठाण्यात कार्यरत होता. यापूर्वी तो मालवणी पोलीस ठाण्यात कार्यरत होता. तो ड्रग्जची विक्री करत असल्याचा संशय होता. त्यानुसार मालवणी पोलिसांनी सापळा रचून किरण इंदुलकर याला 5 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) किंवा ‘म्याव-म्याव’ विकताना रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस दलातील कर्मचाऱ्याच्या गुन्ह्यातील सहभागामुळे मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली आहे.
किरण इंदुलकर हा बीडीडी नायगाव येथील रहिवासी आहे. इंदुलकर पूर्वी मालवणी पोलिस ठाण्यात कार्यरत होता. त्याला या परिसरातील ड्रग्ज नेटवर्कची माहिती असल्याचा संशय आहे. मालवणी पोलीस ठाण्यात असताना किरण इंदुलकर हा अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टोळीच्या संपर्कात आला होता. त्यावेळीच त्याच्याबाबत संशय असल्यामुळे किरण इंदुलकर हा तेव्हापासूनच संबंधित तपासयंत्रणांच्या रडारवर होता.
यापूर्वीही किरण इंदुलकर याच्याबाबत तक्रारी आल्या होत्या. दोन वर्षांपूर्वी ताकीद देऊन इंदुलकरची बदली करण्यात आली होती. तसेच त्याला निलंबितही करण्यात आले होते. सध्या ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या इंदुलकरला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी मालवणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. घटनेमुळे मुंबई पोलिसांच्या प्रतिमेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मालवणी पोलिसांना या परिसरातील गेट क्रमांक 8 जवळ ड्रग्जची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी याठिकाणी सापळा रचला. पोलिसांनी एका व्यक्तीला अमली पदार्थ विक्रेता म्हणून उभे केले. त्यावेळी किरण इंदुलकर त्याठिकाणी आला. त्याने 15 हजार रुपयांना चार ग्रॅम एमडी खरेदी केले. हा व्यवहार पूर्ण होताच, पोलिसांनी किरण इंदुलकर याला तात्काळ अटक केली. मात्र, तो पोलीस कॉन्स्टेबल असल्याचे पोलिसांनाही माहिती नव्हते. नंतर पोलिसांना किरण इंदुलकर हा कॉन्स्टेबल असल्याचे समजले तेव्हा हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.


