सात मंत्र्यांचा पत्ता होवू शकतो कट!
गिरीश महाजन यांच्याकडे संघटनेची जबाबदारी? : शिवसेनेचे सर्वाधिक मंत्री
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याच्या मंत्रिमंडळातील अनेकांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची शक्यता बळावली आहे. घोटाळांचे आरोप झालेल्या, वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आलेल्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांकडून ‘निरोप’ दिला जाईल अशी चर्चा राजकीय क्षेत्रात आहे. नवे सरकार स्थापन होऊन सहा महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी झाला आहे. या कालावधीत अनेक मंत्री वादात सापडले आहेत. यात शिवसेनेच्या नेत्यांची संख्या सर्वाधिक आहे. भाजपाचे संकटमोचक अशी ख्याती असलेले गिरीश महाजन यांच्याकडे संघटनेची मोठी जबाबदारी येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असताना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कँटिनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली. त्यामुळे ते वादात सापडले. यानंतर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट बेडरुममध्ये सिगारेट ओढत असल्याचा व्हिडीओ समोर आला. त्यांच्याजवळ पैशांनी भरलेली बॅग दिसली. त्यामुळे शिरसाट वादग्रस्त ठरले. आपल्याला प्राप्तीकर खात्याची नोटिस आल्याची माहिती खुद्द शिरसाट यांनीच दिली. गृहराज्यमंत्री असलेल्या योगेश कदम यांच्यावर मातोश्रींच्या मालकीच्या बारवर धाड पडली. तिथे बारबाला अश्लील नृत्य करताना आढळून आल्या. हे सगळे नेते शिवसेनेचे आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे सातत्याने वादग्रस्त विधाने करत आहेत. विधान परिषदेचे कामकाज करताना ते रम्मी खेळत असतानाचा व्हिडीओ समोर आला. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या व्यक्तीला कोणत्याही पासशिवाय थेट विधिमंडळात घेऊन गेले. त्याने राष्ट्रवादी काँग्रेस शपचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निकटवर्तीय असलेल्या नितीश देशमुख यांना मारहाण केली. या सगळ्या मंत्री, आमदारांमुळे महायुती सरकारची बदनामी झालेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचा फटका पक्षाला बसू शकतो.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रिपदी संधी दिली जाऊ शकते. नार्वेकर मंत्रिपदी काम करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे त्यांची वर्णी मंत्रिमंडळात लागू शकते. त्यांच्याजागी विधानसभा अध्यक्षपदी सुधीर मुनगंटीवार यांना संधी मिळू शकते. गेल्या दोन अधिवेशनांपासून मुनगंटीवार चांगलेच आक्रमक झालेले आहेत. विविध मुद्द्यांवरुन ते सरकारला धारेवर धरत आहेत. फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील महायुती सरकारमध्ये मुनगंटीवार यांना मंत्रिपद देण्यात आले नाही. तेव्हापासून त्यांनी विधानसभेत अनेकदा सरकारची कोंडी केली आहे. विरोधी पक्षनेत्याला साजेशी कामगिरी त्यांनी सभागृहात केली आहे.
‘यांना’ मिळू शकतो ‘निरोप’!
मुख्यमंत्री फडणवीस काही अकार्यक्षम, वादग्रस्त मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवू शकतात. यामध्ये शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट, संजय राठोड, भरत गोगावले, योगेश कदम यांचा नंबर लागू शकतो. या चौघांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवळ यांचेही मंत्रिपद जाऊ शकते. विशेष म्हणजे भाजपचे संकटमोचक, मुख्यमंत्र्यांचे अतिशय जवळचे मंत्री गिरीश महाजन यांनाही पायउतार व्हावे लागू शकते. जलसंपदा मंत्री असलेल्या महाजन यांच्याकडे संघटनेत महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते.