जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
तब्बल १५३ कलावंतांसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील वस्तुनिष्ठ असलेले राजा रयतेचा या महानाट्याची निर्मिती व सादरीकरण म्हणजे शिवधनुष्यच आहे असे शिवरत्न प्रतिष्ठानचे प्रमुख व महानाट्याचे निर्माते जयवर्धन नेवे यांनी प्रतिपादन केले. गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये रोटरी क्लब जळगावच्या ३५ व्या साप्ताहिक सभेत झालेल्या प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष गिरीश कुलकर्णी, संवाद सचिव पंकज व्यवहारे, प्रोग्राम कमिटी चेअरमन स्वाती ढाके यांची प्रमुख उपस्थिती होती.
रोटरक्ट क्लब मध्ये सक्रिय होतो. नंतर रोटरीमुळे आत्मविश्वास वाढला, वेगळी ओळख मिळाली. पुढे शिवरत्न प्रतिष्ठानचे कार्य सुरू करून महानाट्य निर्मितीची कल्पना सुचली असे जयवर्धन नेवे यांनी प्रारंभी सांगितले. पुढे त्यांनी बोलताना घरात चार हजार पुस्तके व वडील स्व. दादा नेवे यांच्यासारखा अभ्यासक मार्गदर्शक म्हणून लाभल्यामुळे सुरुवातीला शिवराज्याभिषेक सोहळा व नंतर राजा रयतेचा या महानाट्यापर्यंतची सर्जनशील प्रवासाची कहाणी सांगितली.
इतिहास आणि कल्पनाशक्ती यांचे संतुलन साधताना वस्तुनिष्ठ इतिहासच सादर करावा लागतो. सादरीकरणापूर्वी भीती नंतर उत्साह असे संमिश्र भावना असते असे ते म्हणाले. निधी संकलन व रंगमंच उभारणीच्या विविध अनुभवांसह प्रेक्षकांच्या हृदयस्पर्शी प्रतिक्रिया देखील त्यांनी सांगितल्या. प्रत्येक घरात छत्रपतींचे एक तरी पुस्तक असावे. त्याचे वाचन करावे. युवकांनी केवळ एक दिवस जयंती साजरी न करता महाराजांचा एक तरी गुण आदर्श म्हणून घ्यावा असे नेवे म्हणाले.
हे महानाट्य केवळ मनोरंजन नसून समाज मनाला प्रेरणा देणारी चळवळ आहे. पैसे कमविणे हे आमचे उद्दिष्ट नाही. समाजात विचारांची जागृती करणे हे खरे ध्येय आहे. शिवाजी महाराजांचे नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व पोहोचविण्याचा या महानाट्याद्वारे आमचा प्रयत्न आहे असे त्यांनी सांगितले. राजा रयतेचा हे नाटक माझ्यासाठी केवळ सादरीकरण नसून माझ्या श्वास आहे. हा प्रवास अविश्वासनीय आहे. महानाट्य संधी मिळाल्यास शिवा काशीद यांची भूमिका साकारण्याची इच्छा ही नेवे यांनी व्यक्त केली.
जिजामातांची भूमिका साकारणाऱ्या स्वाती ढाके यांनी रोटरीच्या परिचयातून ही अभिनयाची संधी मिळाली. त्यासाठी अनेक पुस्तके वाचून व मालिका पाहून तयारी केली. या भूमिकेमुळे जिजामातांची जीवन किती कठीण होते याची जाणीव झाली. वैयक्तिक आयुष्यात देखील या भूमिकेचा फायदा झाला. रसिकांनी राष्ट्रधर्मासाठी तुमचा जन्म झाला आहे ही व्यक्त केलेली प्रतिक्रिया मोलाची आहे असे सांगितले. कार्यक्रमात महानाट्यातील कलावंत स्वप्निल नेवे, भूषण नेवे, विजय नेवे, आदित्य वाणी, निलेश चौधरी आणि स्वाती ढाके यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

