पूजेसाठी होम पेटवला.. धूर झाला..

मधमाश्यांच्या हल्ल्यात पुजाऱ्याचा मृत्यू

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

दशक्रिया विधी आटोपल्यानंतर अकराव्याची पूजा करण्यासाठी नदीवर मंडळी जमली होती. दुपारी पूजा सुरु असताना मधमाश्यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात अकराव्याची पूजा करणाऱ्या पुजाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना अमळनेर तालुक्यातील जळोद या गावालगतच्या नदीकाठावर घडली आहे.

अमळनेर तालुक्यातील जळोद येथे डॉ. काकासाहेब देशमुख यांच्या अकराव्याची पूजा होती. सदरची पूजा करण्यासाठी घरातील मंडळींसह पुजारी गेले होते. सदरची पूजा नदीकाठावरच करावी म्हणून अमळनेर येथील पुजारी अमोल शुक्ल (वय ३८) यांनी सांगितले होते. त्यानुसार जळोद येथे नदीकाठावर पुलाखाली देशमुख यांच्या मुली व मुलांसोबत पूजा सुरू होती.

पूजेसाठी होम पेटवला असता त्यामुळे धूर झाल्याने पुलाखाली असलेल्या मधमाश्‍यांच्या पोळ्यापर्यंत धूर पोहोचला. यानंतर मधमाश्‍या उठल्याने त्यांनी पूजेला बसलेल्यांवर हल्ला चढविला. मधमाश्यांचा हल्ला झाल्याने पूजेसाठी जमलेले सर्व जण सैरावैरा पळू लागले. मात्र पुजारी अमोल शुक्ल यांनी पळू नका. खाली झोपून घ्या; त्या चावणार नाहीत असे सर्वाना सांगत ते खाली वाकले.

पुजारी अमोल हे खाली वाकून राहिल्याने मधमाश्‍या त्यांच्या तोंडाला चावल्या. यात ते जखमी झाले होते. त्यांना अधिक त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी त्यांना अमळनेर येथे आणले जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर इतर पाच ते सहा जणांनाही मधमाश्‍या चावल्याने त्यांचे अंग सुजले होते. त्यांच्यावर अमळगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.