मनमाड, लोकशाही न्यूज नेटवर्क
अंमली गांजा लागवड करून छुप्या पद्धतीने त्याची शेती केली जात असल्याचे वारंवार समोर आले आहे. त्यानुसार कांद्याच्या पिकात गांजा लागवड करण्यात आल्याचे मालेगाव तालुक्यातील वडनेर- खाकुर्डी या गावात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी शेतात छापा टाकत लागवड केलेला गांजा जप्त केला असून लागवड करणाऱ्या एका जणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील वडनेर येथे शिवारातील भरत म्हसदे (वय ५५) यांनी सहा ते सात महिन्यापूर्वी शेतातील चार ते पाच गुंठ्यात गांजाची लागवड केली होती. याबाबतची माहिती मिळाल्यावरून पोलिस व महसूल विभागाच्या एकत्रित पथकाने शेतात छापा टाकत पाहणी केली. यावेळी पोलीसांना सहा महिन्याचे गांजाची पिके लागवड केलेल्या अवस्थेत मिळून आले. पोलिसांनी सर्व गांजाची झाडे उपटून जप्त केली.
वडनेर- खाकुर्डी पोलिसांनी शेतात छापा टाकत गांजाची शेती उध्वस्त केली. तसेच याठिकाणी लागवड केलेल्या सुमारे २ लाख २९ हजाराचा ३६ किलो ओला गांजा जप्त केला असून याप्रकरणी गजानन कासार यांच्या तक्रारीवरून वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात भरत यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपअधीक्षक नितीन गणापुरे, नायब तहसीलदार रमेश खैरे, सहायक पोलिस निरीक्षक शिरीषकुमार देशमुख आदी उपस्थित होते.