गिरीश महाजनांच्या जामनेरात जैन बहुउद्देशीय संस्थेचा हैदोस..!

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

‘दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिये’ असे म्हणतात ते खरे आहे. महाराष्ट्रात भाजपचे संकट मोचक असलेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर या मतदारसंघात प्रकाशचंद जैन बहुद्देशीय संस्थेच्या नावे गेल्या बारा वर्षापासून शासनाची कसलीही परवानगी न घेता खोटे कागदपत्र सादर करून संस्थे अंतर्गत आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय, होमिओपॅथी महाविद्यालय, नरसिंग महाविद्यालय, जैन इंटरनॅशनल स्कूल आदींची शासनाची दिशाभूल करून 2012 पासून कसल्याही सुख सुविधा नसताना कोट्यावधींची कमाई केली जात आहे. आयुर्वेदिक महाविद्यालयाची इमारत नसताना एका हॉलमध्ये कॉलेज दाखवून बोगस विद्यार्थ्यांना प्रवेश दाखवून शासनाच्या पैशाची लूट केली जात आहे. वैद्यकीय महाविद्यालय, होमिओपॅथी महाविद्यालय आणि नर्सिंग महाविद्यालय कागदोपत्री दाखवून बोगस संस्था चालविणाऱ्या प्रकाशचंद जैन या महाभागाचा विधानसभेत परदा फाश झाला. या संस्थेच्या सर्व विद्यालयातील प्रवेश प्रक्रिया शासनाने तातडीने स्थगित केल्याचे वैद्यकीय मंत्री हसनमुश्रीफ यांनी विधानसभेत एका लक्षवेधीला उत्तर देताना जाहीर केले.

शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून जामनेर येथील प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून बोगस महाविद्यालय चालवीत असल्याचे पुराव्यानिशी परदा फाश केला. त्या संदर्भात यावलचे आमदार अमोल जावळे आणि चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी विचारलेल्या उपप्रश्नांनाही हसन मुशिरप यांनी उत्तर दिले. जामनेर येथील प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेचा संपूर्ण कारभार बोगस असून त्यात विद्यार्थ्यांची विशेषतः आदिवासी विभागातील विद्यार्थ्यांची मोठी फसवणूक झाली असल्याने संस्थेचा परवाना तातडीने रद्द करावा. विद्यार्थ्यांची तसेच शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, तसेच अशा प्रकारचे एक संपूर्ण महाराष्ट्रात रॅकेटच असून ही एक संघटित गुन्हेगारी असून त्याच्यावर मकोका अंतर्गतही कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदारांनी केली. तेव्हा मंत्री हसनमुश्रम यांनी आठ दिवसात चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्या संस्थेची परवानगी सुद्धा रद्द करण्यात येईल, असे स्पष्टपणे सांगितले. ही बाब अत्यंत गंभीर असून महाराष्ट्रातील अशा प्रकारच्या रॅकेटचाही शोध घेऊन त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी अंतर्गत मकोकाची कारवाई सुद्धा केली जाईल, असेही मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

गेल्या एक वर्षापासून जामनेर येथे प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेचे संचालक प्रकाशचंद जैन यांनी बोगस शासकीय संघाच्या संस्थांच्या नावे कोट्यावधींची कमाई केली. गेल्या बारा वर्षापासून जामनेरत हा बोगस प्रकार प्रकाशचंद जैन उजळ माथ्याने करून साळसूतपणे वावरत होते. त्यांच्या सर्व परवानग्या बोगस आहेत. ज्यांची ज्यांची परवानगी साठी सही लागते त्यांच्यावर बोगस सही शिक्क्याने बिनधास्तपणे परवानगी मिळवली. शासनाच्या हे लक्षात आले कसे नाही? हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच हे सर्व बोगस कागदपत्र तयार करण्याची हिम्मत प्रकाशचंद जैन यांच्यात निर्माण झाली कशी? हा ही एक प्रश्नच आहे. जैन यांचे पाठीशी कोणीही तरी असल्याशिवाय एवढे बोगस काम करणे शक्यच नाही. जामनेर मध्ये वा जामनेर तालुक्यातच हा बोगस प्रकार चाललाय, हे लक्षात येऊ नये, याचे इतके दुर्दैव काय? प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने इंटरनॅशनल स्कूल सुद्धा चालविण्यात येते. संस्थेच्या वतीने वृत्तपत्रात मोठ मोठ्या जाहिराती देऊन बोगस संस्थांना जाहिरातीच्या माध्यमातून बळ दिले. प्रकाशचंद जैन पतसंस्था सुद्धा आहे. त्याच्या माध्यमातून पैशाचा स्त्रोत निर्माण केला जात असावा. या पतसंस्थेची सुद्धा चौकशी झाली तर त्यावरील बोगस प्रकार चव्हाट्यावर येतील.

बोगस संस्थांच्या माध्यमातून कोट्यावधीची कमाई या पैशांच्या माध्यमातून केली असून अनेकांना वश करण्यात त्यांना आतापर्यंत यश आले आहे. ‘सबकुछ पैसा बोलता है’ या न्यायाप्रमाणे जामनेर तालुक्यातील प्रकाशचंद जैन यांना प्रतिष्ठेचे स्थान मिळाले. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून अनेक जण लाभार्थी असल्याने बोगस प्रकाराला प्रतिष्ठा मिळाली. बोगस प्रतिष्ठेची हवा जैन यांच्या डोक्यात शिरली. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये, परंतु पैशाच्या मस्तीतून त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात काहीही बरळू लागले. तेव्हा त्यांच्या पापाचे 100 घडे भरल्याने त्यांचा विधानसभेत परदा फाश झाला. विधानसभेत जिल्हा बाहेरच्या आमदारांऐवजी जळगाव जिल्ह्यातील आमदारांनी लक्षवेधी विचारली नाही, हे मात्र खटकणारे आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.