लोकशाही संपादकीय लेख
ऑगस्टच्या शेवटच्या पंधरवड्यात जळगाव जिल्ह्यात पाऊस धो धो बरसला. आता पावसाने उसंत घेतली असे वाटत असतानाच सप्टेंबर महिन्याची सुरुवातही पावसाच्या जोरदार बॅटिंगनेच झाली. या आधीच जळगाव जिल्ह्यातील सात मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले अजून त्याच्या नुकसानीचे पंचनामे ही पूर्ण झालेले नाहीत. परंतु सप्टेंबर महिन्याची सुरुवातच पावसाच्या जोरदार बॅटिंगने झाली आहे. काल 26 मिलिमीटर इतका पाऊस जळगाव शहरात झाला. शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी साचले होते. सर्व रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहनधारकांची मात्र मोठी कुचंबना होते आहे. गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने पाऊस बरसत असल्याने गणेश भक्तांची देखील मोठी निराशा झाली आहे. शहरातील गणेश मंडळाचे देखावे पाहणाऱ्या गणेश भक्तांच्या आनंदावर पावसाने वीरजण टाकले आहे.
यंदाच्या गणेशोत्सवाने गणेश भक्तांसाठी पाऊस आणला आहे. जिल्ह्यातील शेतकरी पावसामुळे आनंदित असला, तरी आता “नको रे बाबा पाऊस..”, “पाऊस थांबला पाहिजे..” असे साकडे गणरायाला घातले जात आहे. गेल्या पंधरा-वीस दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील धरणाच्या पाण्याची पातळी समाधानकारक भरलेली दिसत नव्हती. परंतु गेल्या पंधरवड्यात धरणे जवळजवळ पूर्णपणे भरलेली आहेत. वाघूर धरण हाऊसफुल झाले आहे. हातनूरचे वीस दरवाजे उघडले गेले आहेत. बाकी मध्यम व छोटे प्रकल्प पूर्ण भरलेले आहेत. निसर्गाची किमया काही न्यारीच असते. जेव्हा शेतकरी पावसाची वाट पाहत आभाळाकडे डोळे लावून बघत राहतो तेव्हा पाऊस शेतकऱ्यांना घाबरूवून सोडतो आणि आता ‘नको नको’ म्हणण्याची वेळ आली तर धो धो बरसत राहतो. परंतु काही का असेना, यंदाचा गणराया पाऊस घेऊन आला आहे, एवढे मात्र खरे आहे. काही काही वर्षात पावसासाठी “धोंडी धोंडी पाणी दे..” म्हणून आराधना करावी लागत असते. अवर्षणावर मात करण्यासाठी शासनातर्फे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठीही वारेमाप खर्च केल्याचे आपण पाहिले आहे. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात एक प्रकारे चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र व जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने आनंदाची बाब म्हणता येईल.
‘आता अजून पाच दिवस पावसाचे आहेत’, असा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे पाऊस पाच दिवस जर धोधो बरसला तर शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडून त्यांच्या डोळ्यात पाणी येईल, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. त्यामुळे गणराया तुझ्या आगमना बरोबरच पाऊस घेऊन आलास, त्याबद्दल मानावे तेवढे आभार. आता मात्र “विसर्जनाबरोबर पावसाचे विसर्जन कर..”, “सतत धोधो बरसणारा पाऊस तुझ्यासोबत घेऊन जा..”, “हवा तेवढाच पाऊस आता बरसू दे…” असे म्हणण्याची वेळ आली आहे. निसर्गासमोर कोणाचेही काही चालत नाही. निसर्गापुढे विज्ञान सुद्धा काही करू शकत नाही. म्हणून निसर्गाला तुम्ही-आम्ही जपण्याची गरज आहे. निसर्गावर कुणी मात करण्याचा प्रयत्न करू नये. पर्यावरणाची जपणूक करा, निसर्ग तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही. आता एवढीच प्रार्थना करावी की, ‘आमच्या शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिसकावून घेऊ नको..!’