लोकशाही न्यूज नेटवर्क

लखनऊ–आग्रा एक्सप्रेसवेवर भीषण अपघात घडला आहे. मंगळवारी २६ मे रोजी पहाटे एक वेगवान बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्यावर जाऊन धडकली आणि उलटली. यानंतर बसच्या खिडकीतून प्रवासी बाहेर फेकले गेले. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला, तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले. हा अपघात लखनऊ–आग्रा एक्सप्रेसवे वरील उन्नाव जिल्ह्यातील औरास पोलीस ठाणे हद्दीत घडला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, डबल डेकर बस दिल्लीहून गोरखपूरकडे निघाली होती. पहाटेच्या सुमारास बस वेगात असताना चालकाला अचानक डुलकी लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. यामुळे बसवरील नियंत्रण सुटले आणि ती रस्त्याच्या कठड्यावर जोरात आदळून उलटली. अपघात इतका भीषण होता की, बसच्या काचा फुटून काही प्रवासी खिडक्यांमधून बाहेर फेकले गेले.
या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये एक पोलीस अधिकारी आणि एका कैद्याचा समावेश आहे. मृत पोलीस अधिकाऱ्याचे नाव रामचंद्र राम असून ते बिहारमधील सीवान पोलीस लाईनमध्ये कार्यरत होते. तर मृत कैद्याचे नाव छत्रपाल सिंह असे आहे. संबंधित कैद्याला बिहार पोलीस गुरुग्राम येथील न्यायालयात सुनावणीसाठी घेऊन गेले होते. सुनावणी पूर्ण करून परतताना हा दुर्दैवी अपघात घडला.
अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे ३० प्रवासी होते. बस कठड्यावर आदळल्यानंतर अनेक प्रवासी रस्त्यावर फेकले गेले, ज्यामुळे त्यांना गंभीर दुखापती झाल्या. एका प्रवाशाचा पाय तुटल्याचीही माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्य राबवत जखमींना बाहेर काढले आणि वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू केले. या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, पोलिसांनी अपघाताचा पुढील तपास सुरू केला असून, चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.


