लोकशाही संपादकीय लेख
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल होऊन त्या उमेदवारी अर्जांची छाननी पार पडली. ४०२ अर्जांपैकी ३०९ अर्ज वैध, तर ९३ उमेदवारी अर्ज बाद झाले. जशी उमेदवारी अर्जांची छाननी झाली, तसे ज्यांचे अर्ज बाद झाले त्यांचा थयथयाट पाहायला मिळाला किंवा आपण घेतलेल्या उमेदवारी अर्जांबाबतच्या हरकती फेटाळल्या गेल्यानंतर हरकती करणाऱ्यांनी केला. त्यात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उमेदवारी अर्जाबाबत मुक्ताईनगर येथून आमदार चंद्रकांत पाटील यांनी हरकत घेतली होती. रक्षा खडसे यांचा उमेदवारी अर्ज बाद करावा, अशी त्यांची मागणी होती. परंतु रक्षा खडसे यांनी कर्ज भरल्याचा दाखला सादर केल्यानंतर त्यांचा तो अर्ज वैध ठरला. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांचे खडसेमुक्त जिल्हा बँक करण्याचे स्वप्न पाहत होते, त्या स्वप्नाचा पूर्णपणे चुराडा झाला. दुसरे, पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांचा मुलगा सुमित पाटील यांचा अर्ज बाद झाल्यानंतर त्यांनी जो थयथयाट केला, तो वाखाणण्यासारखा होता. माझा अर्ज बाद करण्यामागे दबाव तंत्राचा वापर केला गेला, असा आरोप सुमित पाटील यांनी करून आपला अर्ज कसा वैध आहे, याबाबत जो युक्तिवाद केला, तो त्यांच्या दृष्टीने सकारात्मक होता; पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे त्यामुळे समाधान झाले नाही. म्हणून त्यांचा अर्ज बाद झाला. तरी दुसऱ्या दिवशी निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन आम्ही आता शिवसेना स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी दिला. आता हे हायकोर्टात जाऊन दाद मागणार आहेत. दरम्यान, त्यांच्या विरोधातील आमदार किशोर पाटील यांचे कट्टर शत्रू भाजपचे सतीश शिंदे यांचा एकच अर्ज असल्यामुळे त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. बाकी, सलग दहा वर्षे संचालक राहिल्यामुळे बँकेच्या नवीन नियमानुसार बँकेचे चेअरमन संजय पवार आणि अमळनेरचे माजी मंत्री अनिल पाटील यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले. संजय पवार यांना हे माहीत होते, म्हणून त्यांनी त्यांची पत्नी सोनल पवार यांच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे आणि त्यांचा तो अर्ज वैध ठरला आहे.

