जळगाव : जिल्ह्यात नवनवीन छोटे मोठे उद्योग यावेत तसेच युवकांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्नशील असून उद्योजक समाधानी तर जिल्हा समाधानी याप्रमाणेच जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राचा विकास झाला तर जिल्ह्याचा विकास होईल असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित शासनामार्फत केंद्र सरकारच्या जिल्हा ‘जळगाव हे निर्यात केंद्र’ या कार्यशाळेचे पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, उद्योग संचालक वृषाली सोनी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी उपस्थित होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, जिल्ह्याला औद्योगिक क्षेत्रामध्ये आता डी प्लस क्षेत्राचा दर्जा मिळाला असल्यामुळे जिल्ह्यात नवीन उद्योग आले, येतील राज्याच्या औद्योगिक धोरणामुळे जळगावला एक चांगली संधी मिळाली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील विकासाला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. हा दर्जा जिल्ह्याला मिळण्यासाठी सर्व उद्योजक आमच्या सोबत होते, उद्योजकांना जी मदत लागत होती ती आम्ही केली डी प्लस दर्जा मिळण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत माझ्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केल्यामुळे हा दर्जा मिळाला आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मदत केली.
औद्योगिक क्षेत्रात प्रशिक्षण घेतलेल्या युवकांना नवीन उद्योग उभारण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे, येणाऱ्या काळात छोटे छोटे नवीन उद्योग या ठिकाणी घ्यावेत यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करू. जिल्ह्यातील केळी उद्योगाला चालना मिळावी यासाठी अंगणवाड्यांच्या पोषण आहारात केळीचा समावेश करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
माहिती कक्ष सुरु करणार!
जिल्हाधिकारी रोहन घुगे म्हणाले की, उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी, प्रशासनातर्फे सुद्धा प्रयत्न सुरू आहेत, बेरोजगार युवकांना नोकरी, नवीन व्यवसायाबाबत माहिती व्हावी यासाठी आगामी काळात जिल्हाधिकारी कार्यालयात एक माहिती कक्ष सुरू करत आहोत. या केंद्रामार्फत प्रशिक्षित युवकांना नोकरीची संधी कुठे कुठे उपलब्ध असेल,व्यवसाय करणाऱ्या युवकांसाठी नवीन व्यवसाय बाबतची माहिती या केंद्रमार्फत दिली जाणार आहे असे त्यांनी सांगितले.

