जळगाव जिल्ह्यावर अवकाळी पावसाचे संकट कायम

फेब्रुवारी–मार्चमध्येही पावसाची शक्यता, शेती अडचणीत

0

जळगाव | जळगावसह राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. ऐन हिवाळ्यात थंडीचा प्रभाव कमी झाला असून ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाच्या सरी बरसत आहेत. २७ जानेवारी रोजी जळगाव जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत. दरम्यान, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातही अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मागील काही दिवसांपासून जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम आहे. यामुळे तापमानात सतत बदल होत असून थंडीचा जोर ओसरलेला आहे. बुधवारी ३१.५ अंश सेल्सिअस असलेले कमाल तापमान गुरुवारी २७.६ अंशांपर्यंत खाली आले. तर रात्रीच्या तापमानात किंचित वाढ होऊन किमान तापमान १५ अंशांवर नोंदवले गेले.

आठ तालुक्यांना अवकाळीचा फटका
२७ जानेवारी रोजी झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील चोपडा, रावेर, चाळीसगाव, मुक्ताईनगर, एरंडोल, पारोळा, जळगाव आणि धरणगाव या आठ तालुक्यांतील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. चोपडा तालुक्यातील ५७ गावांमध्ये गारपिटीचा फटका बसला आहे. चाळीसगाव तालुक्यातील ९ गावांतील पिके बाधित झाली आहेत. जळगाव तालुक्यात १७, मुक्ताईनगरमध्ये ६५, एरंडोलमध्ये १६, पारोळ्यात २५ तर धरणगाव तालुक्यातील ५४ गावांमधील रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

आजचे हवामान कसे असेल?
आज जिल्ह्यात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान १४ ते १६ अंशांच्या दरम्यान राहणार असल्याने रात्री आणि पहाटे गारठा जाणवू शकतो. तर कमाल तापमान ३० ते ३३ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याने दुपारच्या वेळी उष्णता जाणवेल. मात्र, ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश कमी मिळणार असल्याने दिवसभर हवेत ओलावा आणि सौम्य थंडावा टिकून राहील.

पुन्हा अवकाळीचा इशारा
२७ जानेवारी रोजी झालेल्या गारपीट व वादळी पावसाने जळगाव जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. हातातोंडाशी आलेली रब्बी पिके नष्ट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. फेब्रुवारी व मार्च या कालावधीत रब्बी पिकांची काढणी होत असते. मात्र, याच काळात पुन्हा अवकाळी व वादळी पावसाचा धोका असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.