लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह यावर सुनावणी सुरू आहे. ठाकरे गाटतर्फे ज्येष्ठ वकील कपील सिब्बल हे आपली बाजू मांडत आहेत. ठाकरे गटावर कसा अन्याय झाला, हे कपिल सिब्बल न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. ठाकरे गट आपली पाचव्या दिवशी आपला युक्तिवाद करत आहेत. दरम्यान, आजच्या युक्तिवादात कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. निवडणूक आयोगाने नेमकी काय चूक केली? निर्णय कसा फिरवला याबाबत सिब्बल यांनी न्यायालयाला माहिती दिली.
युक्तिवाला सुरुवात झाल्यानंतर कपिल सिब्बल यांनी ठाकरे यांचा पक्ष हाच खरी शिवसेना आहे, न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. आमदारांनी बंडखोरी केली त्यावेळी आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष घेणार होते. याबाबतचे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे होते. यावर निर्णय होण्याआधीच निवडणूक आयोगाने आपला निर्णय घेऊन टाकला. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय होण्याआधीच निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष कोणाचा आणि निवडणूक चिन्ह कोणाचे, याबाबतचा निकाल जाहीर केला. निवडणूक आयोगाची ही भूमिका चुकीची होती, असा जोरदार युक्तिवाद सिब्बल यांनी केला.
आमदार अपात्रतेच्या निर्णयाशिवाय निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय चुकीचा होता, असा थेट आणि मोठा दावा सिब्बल यांनी केला. 2018 सालच्या घटनेनुसार पक्षाचे सर्व अधिकार ठाकरे यांच्याकडेच आहेत. एखादा गट अन्य पक्षात विलीन होणे ठीक आहे, परंतु पक्षावरच दावा करणे हे चुकीचे आहे, विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णयही चुकीचा आहे, असंही सिब्बल आपल्या युक्तिवादामध्ये म्हणाले.
कोण आमदार कुठे आहे, याबाबत प्रश्नचिन्ह होते. असे असतानाही निर्णय घेणं चुकीचं होतं. विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेतला नाही. तिकडे निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह आणि पक्ष यावर निर्णय देऊन टाकला. हे चुकीचं होतं, असंही सिब्बल आपल्या युक्तिवादादरम्यान म्हणाले. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी विधानसभा अध्यक्षांनी आपल्या मर्यादा ओलांडल्या असाही मोठा आरोप आपल्या युक्तिवादामध्ये केला. त्यामुळे आता या युक्तिवादावर शिंदे गट काय बाजू मांडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


