दीपक कुलकर्णी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल सोमवारी वाजल्यानंतर उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरु झाली असली तरी भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात उमेदवारी जार्इल हे निश्चित मानले जात आहे. मतदार संख्या जास्त असल्याने शिवसेना (शिंदे गट)ला जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही असा शड्डू भाजपाने ठोकला आहे.
महायुतीच्या समोर महाविकास आघाडी या निवडणुकीत तुलनेने कमकुवत स्थितीत आहे. आघाडीकडे केवळ 74 मतदारांचे संख्याबळ असून, अद्याप कोणत्याही संभाव्य उमेदवाराचे नाव समोर आलेले नाही. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत संघर्षच या निवडणुकीतील मुख्य चर्चेचा विषय ठरत आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण 564 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका प्रलंबित असल्याने 68 जिल्हा परिषद सदस्य आणि 15 पंचायत समिती सभापती मतदानापासून वंचित राहणार आहेत.
परिणामी जळगाव महापालिकेसह जिल्ह्यातील 16 नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींमधील नगरसेवकांवरच निवडणुकीचा कौल अवलंबून राहणार आहे. मतांच्या गणितात महायुतीकडे 389 मतांचे स्पष्ट बहुमत आहे. महाविकास आघाडीकडे 74 मते आहेत, तर 102 मतदार स्थानिक आघाड्या आणि अपक्ष गटांमधून निवडून आलेले आहेत. यापैकी काही सदस्य महायुतीच्या तर काही महाविकास आघाडीच्या जवळचे मानले जात असल्याने त्यांच्या भूमिकेलाही महत्त्व प्राप्त झाले आहे.
भारतीय जनता पक्षाकडे इच्छुकांची यादी मोठी असली तरी संकटमोच मंत्री गिरीश महाजन यांचा शब्द अंतिम असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह कोअर कमेटी अंतिम निर्णय घेणार आहे. भाजपाकडून डॉ. केतकी पाटील, नंदू अडवाणी, अमोल शिंदे व नंदू महाजन ही नावे चर्चेत असली तरी ऐनवेळी धक्कातंत्राचा देखील वापर होवू शकतो अशी शक्यता बळावली आहे. दुसरीकडे शिवसेनेने देखील या जागेवर दावा सांगतला असला तरी त्यांच्याकडे अपूर्ण संख्याबळ असल्याने त्यांचा दावा कितपत चर्चा घडवून आणतो हे पाहणे उत्सुकतेचे आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील यांचे नाव आघाडीवर असून दुसरे नाव अद्याप समोर आलेले नाही.


