आवडता बैल उधळला अन मालकाला गळफास

दोरखंड गळ्यात अडकून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

0

 

सोयगाव

चरत असताना बैल भडकून हातातील कासरा गळ्यात गुतल्याने शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. २८) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली याप्रकरणी बुधवारी (दि. ३०) दुपारी दोन वाजता घटनेचा महसूल विभागाने पंचनामा केला.

लखन नामदेव शिंदे(वय २४) असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे सोयगाव तालुक्यातील पळाशी शिवारात गट क्र-३०५ मध्ये तो स्वतःची दोन्ही बैल शेताच्या बांधावर चारत असताना हातात दोन्ही बैलांची कासरे घेवून तरुण शेतकरी हा बैल चारत होता. परंतु त्यातील एक बैल अचानक उधळून त्याच्या हातातील बैलाचा कासरा जीव वाचवण्याच्या नादात थेट गळ्याशी येवून त्याला घट्ट आवळपट्टी बसली. यात फास लागून यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान रात्री उशिरापर्यंत तरुण शेतकरी घरी न परातल्याने घरच्यांनी त्याचा शोध घेतला असता, रात्री आठ वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह शेतात आढळून आला. त्यास तातडीने बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. मंगळवारी सकाळी बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याचे शवविच्छेदन करण्यात येवून दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात शोकाकुल वातावरण पसरले आहे.

बैल तसा मारका पण..

सदर बैल हा मारका होता परंतु लखन शिंदे यांच्या जवळ तो बैल शांत राहत असे. इतर कोणालाही तो बैल हात लावू देत नव्हता. लखन व त्या बैलाची पहिल्या पासूनच जवळीक असल्याचे ग्रामस्थ सांगतात. परंतु गवतात चरत असताना त्या बैलाला काहीतरी अचानक दिसल्याने तो भडकला असावा, असा अंदाज लावण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.