चेंगराचेंगरीनंतर भाविकांचे मृतदेह गंगा नदीत फेकले..!
त्यामुळेच पाणी दूषित : जया बच्चनचे वादग्रस्त विधान
लोकशाही न्यूज नेटवर्क
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात २९ जानेवारीला मौनी अमावस्येच्या निमित्ताने सुमारे ८ कोटी लोकांनी स्नान केले होते. यावेळी संगमवरील बॅरिकेड्स तुटल्यानं चेंगराचेंगरी झाली होती. ज्यात ३० भाविकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर विरोधकांनी योगी सरकारवर टीकास्त्र डागलं. अशातच समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी या दुर्घटनेबाबत यूपी सरकारवर मोठा आरोप केला आहे. अपघातानंतर भाविकांचे मृतदेह गंगा नदीत फेकल्याचा दावा जया बच्चन यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
संसद भवन संकुलात मीडियाशी बोलताना जया बच्चन यांनी योगी सरकारवर टीकेचे बाण सोडले. ‘महाकुंभमेळ्यात झालेली चेंगराचेंगरी ही मोठी दुर्घटना आहे. त्यांनी मृतांची नेमकी संख्या उघड करून याघटनेबाबत जनतेला स्पष्टीकरण द्यावं. ते खोटं बोलतायेत. व्यवस्था सामान्यांसाठी नाही, तर व्हीआयपींसाठी होती. महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत मृतदेह नदीत फेकण्यात आल्या आहेत. नदीत मृतदेह फेकून दिल्यामुळे गंगेचं पाणी दूषित झालं आहे. हेच पाणी लोक पीत आहेत. सर्वात जास्त दूषित पाणी फक्त महाकुंभमेळ्यात आहे, अशी टीका जया बच्चन यांनी केली आहे.
प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली होती. २९ जानेवारीला मौनी अमावस्येला लाखोंच्या घरात भक्त गंगेच्या तीरावर पोहोचले होते. मात्र चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर विरोधी पक्ष नेत्यांनी योगी सरकारला निशाणा साधत धाऱ्यावर धरलं. उत्तर प्रदेशचे भाजप सरकार मृतांची आकडेवारी लपवत असल्याचा आरोप विरोधकांनी केला.
समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत झालेल्या मृतांबद्दल एक विधान केलं होतं. ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. विश्व हिंदू परिषदेने जया बच्चन यांच्या अटकेची मागणी केली आहे. महाकुंभ हा श्रद्धा आणि भक्तीचा आधारस्तंभ आहे. चुकीची आणि खोटी विधाने देऊन लोकांना दिशाभूल करू नका. जया बच्चन यांनी केलेलं विधान पूर्णपणे चुकीचे आहे. त्यांना अटक केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.