वृध्द दाम्पत्याचे घरात आढळले मृतदेह; घातपाताचा संशय…

0

 

मालेगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

मालेगाव शहरातील हिंगलाजनगर भागात एक वृध्द दाम्पत्याचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आल्याची घटना घडली आहे. पत्नीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत तर पतीचा मृतदेह बेडवर जखमी अवस्थेत वेगवेगळ्या खोलींमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घरातून पहाटेच्या सुमारास धूर निघू लागल्याने हा प्रकार उघडकीस आला.

या घटनेची अधिक माहिती अशी की, हिंगलाजनगर सर्व्हे नंबर 55 मध्ये ताज बेकरीच्या मागे अल्ताफ हुसेन मोहंमद सईद (70) व त्यांची पत्नी अलकमा अल्ताफ हुसेन (68) हे वृध्द दाम्पत्य एकटेच राहत होते. त्यांचा इंजिनिअर असलेला मुलगा पुणे येथे नोकरीस आहे. तर तिन्ही लग्न झालेल्या मुली घरालगत वास्तव्यास असल्याचे बोलले गेले.

आज पहाटेच्या सुमारास अल्ताफ हुसेन यांच्या घरातून धूर निघू निघत असल्याचे निदर्शनास आल्याने परिसरातील नागरीकांनी घराकडे धाव घेत आग विझविण्यास प्रारंभ केला. मात्र यावेळी एका खोलीत बेडवर जखमी अवस्थेत अल्ताफ हुसेन यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता तर दुसर्‍या खोलीत त्यांची पत्नी अलकमा यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत दिसून आला.

आगीमुळे घरातील इतर साहित्य देखील जळाल्याने त्याचा धूर निघत असल्याचे निदर्शनास येताच नागरीक हादरले. त्यांनी या घटनेची माहिती लगतच राहत असलेले त्यांचे जावई शेख मोईन व मुलीस दिली.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, सहाय्यक पोलीस अधिक्षक तेगबीरसिंह संधू, शहर पोलीस ठाण्याच्या सपोनि प्रिती सावंत यांनी धाव घेत घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी प्राथमिक नोंद करण्यात आली असली तरी सर्व शक्यता तपासून पोलीस या घटनेची कसून चौकशी करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.