बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी
‘हे’ आहे मोठे कारण : बिश्नोई गँगची फेसबुक पोस्ट चर्चेत
मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री मुंबईतील वांद्रे पूर्व भागात तीन लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. निर्मलनगरच्या कोलगेट मैदानाजवळ त्यांचा आमदार मुलगा झिशान सिद्दीकी याच्या कार्यालया बाहेर हा हल्ला करण्यात आला. दरम्यान तपासात सुरुवातीपासूनच संशयाची सुई लॉरेन्स बिश्नोई गँगकडे फिरत होती. तसे संकेत आधीपासूनच देण्यात आल्याचे समोर आले आहे.
दरम्यान बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतल्याची माहिती समोर येत आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट करत बिश्नोई गँगने हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. दाऊदचे निकटवर्तीय असल्याने हत्या केल्याचा उल्लेख पोस्टमध्ये करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये बिश्नोई गँगकडून दावा करण्यात आली आहे की, त्यांना सलमान खानसोबत कोणतंही युद्ध नको होतं, परंतु बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचं कारण त्यांचे दाऊद इब्राहिम आणि अनुज थापन यांच्याशी संबंध होते. सलमान खान आणि बाबा सिद्दीकी यांची घनिष्ठ मैत्री आहे. सलमान खान याला घाबरवण्यासाठीच ही हत्या केल्याचे बोलले जात आहे. तर आता बिश्नोईचा खास मित्र रोहित गोदाराचं एक विधान चर्चेत आलं आहे. सलमान खानचा जो जवळचा तो आमचा शत्रू असे तो म्हणाला होता.

बिश्नोई गँगकडून करण्यात आलेली फेसबूक पोस्ट
‘ओम् जय श्री राम, जय भारत… जीवनाचं मुल्य मला माहिती आहे… मी शरीर आणि पैसा धूळ मानतो. मी पाळलेलं ते सत्कर्म होतं, ते मैत्रीचं कर्तव्य होतं.’ अशी पोस्टची सुरवात करण्यात आली.
बिश्नोई गँगने पुढे पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘सलमान खान आम्हाला हे युद्ध नको होतं. पण तू आमच्या भाईचं आज नुकसान केलं आहे. आज जे बाबा सिद्दीकींच्या प्रामाणिकपणाचं गुणगान गात आहेत एकेकाळी दाऊद मकोका प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात होता. सिद्दीकीयांच्या मृत्यूचं कारण म्हणजे अनुज थापन आणि दाऊदला बॉलिवूड, राजकारण, प्रॉपर्टी डीलिंगशी जोडणं…
‘आमचं कोणासोबत देखील शत्रुत्व नाही. पण जो सलमान खान आणि दाऊद गँगची मदत करेल. त्यांनी यापुढे सावध राहा… आमच्या कोणत्याही भावाच्या जीवाला धोका झाल्यास आम्ही प्रतिक्रिया नक्की देऊ.. पहिला वार आम्ही कधीच केला नाही…जय श्री राम जय भारत…’

गँगस्टर रोहित गोदाराने दिला होता इशारा
मध्यंतरी गँगस्टर रोहित गोदारा याने एका वृत्त वाहिनीशी बोलताना दावा केला होता की सलमान खान आता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. त्याचा जो कोणी मित्र असेल तो आमचा शत्रू आहे. रोहित गोदारा हा पूर्वी गोल्डी बरार गँगसाठी अगोदर काम करत होता. पण आता तो गँगस्टर लॉरेन्स विश्नोईसाठी काम करतो. तो बनावट पासपोर्ट आधारे दिल्लीहून तो दुबईला फरार झाला आहे. परदेशात राहून सुद्धा तो भारतात अनेक गुन्हे करत असल्याचे समोर आले आहे. तो एक मोबाईल टेक्निशियन होता. त्यानंतर तो गँगस्टर झाला. त्याचे खरे नाव रावताराम स्वामी असे आहे. गँगस्टर झाल्यापासून त्याचा कुटुंबाशी कोणताही संपर्क नाही. परदेशात राहून सुद्धा तो भारतात अनेक ठिकाणी गुन्हे घडवत असल्याचे समोर आले आहे. सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येनंतर त्याचे कनेक्शन समोर आले होते.