चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

भद्रावती पोलिसांनी गुन्हेगारीविरोधात आक्रमक भूमिका घेत सलग दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये आरोपींना अटक करून मोठे यश संपादन केले आहे. एका कारवाईत धारदार तलवार बाळगून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या युवकाला पोलिसांनी जेरबंद केले, तर दुसऱ्या कारवाईत चोरीस गेलेल्या दुचाकीचा अल्पावधीत शोध घेत वाहनचोरांना बेड्या ठोकण्यात आल्या. या धडक कारवायांमुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झाला असून नागरिकांकडूनही पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
तसेच भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुधाळा तलाव, किल्ला वॉर्ड परिसरात एक युवक हातात धारदार तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ऋतिक संतोष रामटेके (वय २६, रा. आंबेडकर चौक, भद्रावती) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे ५ हजार रुपये किमतीची लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. याप्रकरणी भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, दुसऱ्या कारवाईत भद्रावती येथून चोरीस गेलेल्या हीरो एचएफ डिलक्स दुचाकी प्रकरणाचा पोलिसांनी वेगाने तपास करत उलगडा केला. फिर्यादी प्रफुल पांडुरंग निगोटे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी यमल तंगराज कोरवन (वय ४०) व गोपाल जिवन मालाकार (वय ३०, दोघेही रा. बंगाली कॅम्प, चंद्रपूर) यांना अटक केली. आरोपींकडून चोरीची दुचाकी व इतर साहित्य असा एकूण सुमारे ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात पोउपनि गजानन दुपकर, महेंद्र बेसरकर, गोपाल आतकुलवार, अनुप आष्टणकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, योगेश घाटोळे, खुशाल कावळे, संतोष राठोड तसेच गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी ही धडक कारवाई यशस्वी केली.
याशिवाय भद्रावती पोलिसांच्या सलग यशस्वी कारवायांमुळे गुन्हेगारांना स्पष्ट इशारा मिळाला असून, कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.


