“त्या” विद्यार्थिनीच्याच हस्ते अंनिस तर्फे वृक्षारोपण…

0

 

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क;

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास भवन संचलित शासकीय कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवगाव, ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक येथील महाराष्ट्रभर गाजलेल्या मासिक पाळी आलेल्या विद्यार्थिनीला वृक्षारोपण करण्यास प्रतिबंध करणाऱ्या प्रकरणाबद्दल महाराष्ट्र अंनिसने (अंधश्रद्धा निर्मुलन समिती) गांभीर्याने दखल घेऊन, प्रत्यक्ष विद्यालयाला भेट दिली.

सदर विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थिनींच्या मनातील अंधश्रद्धा जाणून घेतल्या. चमत्कार सादरीकरण करून, त्यामागील सत्यशोधनाचे प्रात्यक्षिक केले. विद्यार्थिनींकडूनही चमत्काराचे प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करून घेतले. यावेळी “त्या” विद्यार्थिनीला सन्मानाने विचार मंचावर बसवले. आणि तिच्या हस्ते चमत्काराचे प्रात्यक्षिक करून घेतले. वयात येणाऱ्या विद्यार्थिनींना मासिक पाळी संदर्भात शरीरात नेमके काय बदल होतात,  यामागील पाळी विज्ञान कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांनींना समजावून सांगितले. त्यामुळे विद्यार्थिनींच्या मनातील मासिक पाळी संदर्भातील समज व गैरसमज, अंधश्रद्धा, भीती दूर होण्यास मोठी मदत झाली. त्याचबरोबर यावेळी शिक्षकांनाही एकत्र करून त्यांचे प्रबोधन कार्यकर्त्यांनी केले. मासिक पाळी आली म्हणून ज्या विद्यार्थिनीला अपवित्र, अशुद्ध मानून वृक्षारोपण करण्यास प्रतिबंध केला होता, त्याच विद्यार्थिनीच्या हस्ते कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण करून घेतले. यावेळी विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक, शासकीय अधिकारी आणि विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

दरम्यान “त्या” विद्यार्थीनीने आपल्या मनोगतात सांगितले की,  मी स्वतः आता मासिक पाळी किंवा तत्सम अंधश्रद्धांना बळी पडणार नाही आणि इतर माझ्या मैत्रिणींनाही यापुढे अशा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवू नका, असे सांगेन. या मोहिमेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे, कृष्णा चांदगुडे, महेंद्र दातरंगे, कोमल वर्दे, संजय हरले आणि दिलीप काळे हे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.