लोकशाही न्यूज नेटवर्क

नांदेडमध्ये एका शिक्षकाने आपल्या दोन मुलांसह कार गोदावरी नदीत घालून जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली होती. सुरुवातीला ही तिहेरी आत्महत्या असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, या प्रकरणाच्या तपासातून ही सामूहिक आत्महत्या नसून शिक्षकाने आधी आपल्या दोन मुलांची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर त्यांचे मृतदेह कारमध्ये ठेवून कार थेट नदीत घालून आत्महत्या केल्याचे समोर आले. या हत्याकांड आणि आत्महत्येच्या प्रकरणामुळे नांदेड हादरले असून, तपासादरम्यान पोलिसही चक्रावून गेले.
वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवून शिक्षक सुनील मोरे यांनी कार नदीत घातली होती. मात्र, कार नदीत घालण्यापूर्वीच त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची धारदार शस्त्राने हत्या केल्याचे उघड झाले. छातीत आणि पोटात चाकूने वार करून दोन्ही मुलांची हत्या करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले ४२ वर्षीय सुनील मोरे यांनी शुक्रवारी, १६ जुलै रोजी सकाळी आपल्या दोन मुलांसह कार नदीत घालून आत्महत्या केली होती.
नांदेड–मुदखेड मार्गावरील आमदुरा पुलावरून त्यांनी भरधाव वेगाने कार गोदावरी नदीत घातली होती. त्या कारमध्ये त्यांची १४ वर्षीय मुलगी सारा आणि १० वर्षीय मुलगा सुमेध हे दोघेही होते. गट शिक्षणाधिकारी किशन फोले, विस्तार अधिकारी सूर्यकांत बाचे, केंद्रप्रमुख शिवाजी कदम आणि सहकारी शिक्षक दत्ता पवळे यांच्या त्रासाला कंटाळून मुलांसह आत्महत्या करत असल्याचे स्टेटस त्यांनी व्हॉट्सॲपवर ठेवले होते. तसेच, यासंदर्भातील एक संदेशही त्यांनी आपल्या मित्रांच्या ग्रुपवर पाठवला होता.
सुनील मोरे यांच्या मृत्यू प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी चार जणांविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, प्रथमदर्शनी त्यांनी आपल्या दोन्ही मुलांसह कार नदीत घालून आत्महत्या केल्याचे वाटत होते. मात्र, या प्रकरणात धक्कादायक बाब समोर आली. कार नदीत घालण्यापूर्वीच त्यांनी मुलगी सारा आणि मुलगा सुमेध यांच्या छातीवर व पोटात चाकूने वार करून त्यांची हत्या केली होती. त्यानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह कारमध्ये ठेवून कार नदीत घालून स्वतःचेही जीवन संपवले. तिघांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर या हत्याकांडाचा उलगडा झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.


