देवळाली कॅम्प : लॅमरोडवरील जमाल सॅनिट्रीएमसमोर दोन दुचाकींच्या जोरादार धडकेत एक जण जागीच ठार, एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि. ११) रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात शॉन मार्क बेलशेर (वय २६) यांचा मृत्यू झाला असून ते बार्न स्कूलमध्ये शिक्षक असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस अपघाताचा तपास करीत आहे.
लॅमरोडवर दोन दुचाकींच्या धडकेत शॉन मार्क बेलशेर (वय २६) हे बार्न स्कूल शाळेतील शिक्षक जागीच ठार झाले. ते शाळेतच वास्तव्यास होते. तर ओमकार बंडू गायकवाड (वय २४, रा. गायकवाड गल्ली) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास शॉन मार्क बेलशेर त्यांच्या दुचाकीवरून बार्न स्कुलकडून नाशिकरोडच्या दिशेने जात होते. तर ओमकार गायकवाड नाशिकरोडवरून भगूरकडे जात असताना रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास जमाल सॅनिट्रीएमसमोर दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघात दोघांनाही जबर दुखापत झाल्याने स्थानिकांनी त्यांना तत्काळ कॅन्टोमेंट रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी बेलशेर यांना मयत घोषित केले. तर गायकवाड यांना बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले व त्यानंतर खाजगी रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याप्रकरणी देवळाली पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.