डान्सबार, हुक्का पार्लर प्रकरण; गृहमंत्र्यांचे सचिवांना आदेश आ. संजय केळकर देणार पुरावे

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

ठाणे   :-   ठाण्यात नियमबाह्य रात्रभर सुरू असलेल्या डान्सबार, हुक्का पार्लर प्रकरणी आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी गृह सचिवांना कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत तर या प्रकरणी श्री. केळकर पुरावेच सादर करणार असल्याने ठाणे पोलिसांचा दिशाभूल करणारा खुलासा त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता आहे.

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर असलेल्या ठाण्यात कोरोना काळातही रात्रभर डान्स बार, हुक्का पार्लर आदी अवैध व्यवसाय सुरू आहेत. याबाबत आमदार संजय केळकर यांनी उपलब्ध चित्रफितींच्या आधारे ठाणे पोलिसांना कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र शहरात बेकायदेशीरपणे रात्रभर असे धंदे सुरू असल्याचे आढळून आलेले नाही, असा लेखी खुलासा पोलिसांनी केला आहे.

शहरातील जागरूक नागरिक या बाबत तक्रारी करत असून या धंद्याचे पुरावे समाज माध्यमांतून प्रसारित झाले आहेत. यावर कारवाई होणे जनतेला अपेक्षित असताना तक्रार करणाऱ्यांवर दबाव टाकला जातो. ठाण्यासारख्या सुशिक्षित शहराच्या प्रतिमेला डाग लावण्याचा हा प्रकार आहे.

तक्रारीनंतर एक-दोन ठिकाणी थातूर मातूर कारवाई झाली आणि ते व्यवसाय पुन्हा सुरू सुदधा झाले आहेत. असे असताना ठाणे पोलिसांनी केलेला लेखी खुलासा दिशाभूल करणारा आणि खोटा आहे हेच स्पष्ट होते, असे सांगत आमदार केळकर यांनी उत्पादन शुल्क विभागाने याबाबत एकाही व्यवसायावर कारवाई न केल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

या अवैध व्यवसायांबाबत आणि पोलिसांच्या भूमिकेबाबत आमदार संजय केळकर यांनी जनहित डोळ्यासमोर ठेवून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना लेखी कळवून कारवाईची मागणी केली होती. गृहमंत्र्यांनी गृह सचिवांना याबाबत निर्देश दिले असून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

तर श्री.केळकर हे देखील याबाबतचे पुरावे गृह विभागाला सादर करणार असल्याने ठाणे पोलिसांचा खुलासा त्यांच्याच अंगलट येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठाण्याची प्रतिमा डागाळणाऱ्या या अवैध व्यवसायाला कोण पाठीशी घालत आहे? असा प्रश्न नागरीक उपस्थित करत आहेत. आमदार संजय केळकर यांनी सुरू केलेल्या या लोक चळवळीला जागरूक नागरिक, संस्था-संघटना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देऊ लागले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here