लोकमान्य नगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची पुनर्स्थापना

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

ठाणे;  शिवजयंती चे औचित्य साधून ठाणे महानगरपालिकेने लोकमान्यनगर  चैती नगर येथील विठ्ठल क्रिडा मंडळाच्या मैदानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची पुनर्स्थापना केली असून त्याचे लोकार्पण ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री अन् राज्याचे नगरविकास मंत्री श्री.एकनाथजी शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री श्री डॉ.जितेंद्रजी आव्हाड यांच्या हस्ते १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी तुतारीच्या गगनभेदी निनादात झाले. त्याप्रसंगी उपस्थित हजारो शिवभक्तांनी छत्रपतींचा जय जयकार करून त्यांना त्रिवार मानाचा मुजरा दिला.

प्रारंभी येथील स्थानिक नगरसेवक श्री.हणमंत जगदाळे यांनी प्रास्ताविक केले. गेली 40 वर्ष या विभागात केलेल्या लोकपयोगी कामांचा त्यांनी आढावा घेतला. तसेच लोकमान्यनगरचा क्लस्टर च्या माध्यमातून विकास करण्याची ग्वाही दिली.

यावेळी आमदार श्री.रवींद्र फाटक, सभागृह नेते श्री.अशोक वैती, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्री.आनंद परांजपे,श्री.दिलीप बारटक्के,दिगंबर ठाकूर, नगसेविका सौ.आशा डोंगरे,सौ.राधाताई जाधवर,सौ.वनिता घोगरे,तसेच राबोडीच्या नगरसेविका सौ.अंकिता शिंदे,वहिदा मुस्तफा खान, दै.जनादेशचे संपादक श्री.कैलास म्हापदी आदी प्रमुख पाहुणे आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ना.डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी शिव छत्रपतींच्या आदर्श राज्यकारभाराची गौरवगाथा विशद केली. तसेच कोरोना काळात मुख्यमंत्री श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने केलेल्या गुणवत्तापूर्ण व अद्वितीय कामगिरीची प्रशंसा केली.कोरोना महामारीच्या काळात माझी तब्येत बिघडून मी कोमा मध्ये गेलो असता, मुख्यमंत्र्यांच्या अथक प्रयत्नांतून मला वेळीच अत्यावश्यक ती वैद्यकीय सेवा मिळाली.

त्यामुळेच मी आज तुमच्या समोर उभा आहे,अशी भावनिक कबुली त्यांनी यावेळी बोलताना दिली.मी आज जो जिवंत आहे,ते सन्माननीय उद्धवजींमुळेच,असे कृतज्ञतापुर्वक उदगार डॉ.आव्हाड यांनी यावेळी काढले.त्यांची राज्यकारभाराची पद्धत ही शिवकालीन पद्धतीला साजेशी आहे,असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

याप्रसंगी ना.श्री.एकनाथ शिंदे यांनी आपल्या वक्तव्यात शिव छत्रपतींचा रयतेचा राजा म्हणून केलेल्या महान कार्याचा गुणगौरव केला.राजमाता जिजाऊंनी शिवरायांना आदर्श राजा घडविला.अन् त्यांनी केवळ महाराष्ट्र नव्हे तर,हिंदुस्थानचे परकीय शक्तींपासून संरक्षण केलं.ते जर उदयाला आले नसते,तर आज तुम्ही आम्ही नसतो,अशी स्पष्टोक्ती त्यांनी यावेळी केली.त्यांना दैवीशक्ती होती.

जात -धर्म -पंत – प्रांत या पलीकडे जाऊन ठाकरे सरकारने कोरोना काळात कठोर मेहनत घेऊन लोकांचे जीव वाचविले.या उल्लेखनीय कामगिरीचे जागतिक आरोग्य संघटना,केंद्र सरकार,इतर राज्ये,सुप्रीमकोर्ट,हायकोर्ट यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली.हे सर्व शिव छत्रपतींच्या भगव्या प्रेरणेचे फलित आहे,असे त्यांनी ठामपणे सांगितले.

येत्या काळात समूह विकास योजनेच्या माध्यमातून किसननगरच्या धर्तीवर लोकमान्यनगर आणि ठाणे जिल्ह्यातील अन्य भागांचा विकास केला जाईल,असे आश्वासन मा.शिंदेसाहेबांनी यावेळी उपस्थितांना दिले.ठाणे जिल्ह्यातील जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींमधील रहिवाश्यांना त्यांच्या स्वप्नातील सर्व सुविधायुक्त अशी घरकुलं मिळतील,अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.

मा.महापौर श्री.नरेशजी म्हस्के यावेळी म्हणाले की,महापौर नात्याने मी आश्वासन देतो की,ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रभागाला न्याय देण्याच्या भूमिकेतून मूलभूत नागरी सुविधा देण्यात येतील.शेवटी लोकहित साधताना राजकारण बाजूला सारून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वधर्मीय नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत,असा निर्वाळा महापौरसाहेबांनी यावेळी बोलताना दिला.

लोकमान्यनगरच्या पात्र रहिवाश्यांना समूह विकास योजनेचा लाभ मिळण्यासाठी ठाणे महापालिका सर्वतोपरी सहकार्य करेल,अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.शेवटी त्यांनी द्वय मंत्रीमहोदयांचे मन:पूर्वक आभार मानले.यावेळी जनादेशचे संपादक श्री.कैलास म्हापदी यांचेही समयोचित भाषण झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.