जास्त पैशाचे आमिष देत 2.5 कोटींचा गंडा आरोपी अटकेत

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

ठाणे: जास्त पैशाचे आमिष देत तिमाही, सहामाही आणि वार्षिक ठेवीची गुंतवणूक करणाऱ्या ३७ गुंतवणूकदारांची दोन कोटी ५६ लाख ३७ हजार ४२३ रुपयांची फसवणूक करणाऱ्या तुषार तानाजी साळुंखे (३५, रा. हिरानंदानी मेडोज, पोखरण रोड नं. २, ठाणे) या भामट्याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली. त्याला ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

साळुंखे आणि त्याच्या इतर साथीदारांनी सुंतान इन्व्हेस्टमेंट ॲन्ड रिसर्च मार्फतीने शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अनेकांना प्रलोभन दाखविले होते. यात गुंतवणूक केल्यास प्रतिमाह तीन टक्के परतावा मिळेल, अशा आकर्षक वित्तीय योजनांचेही आमिष दाखविले.

त्याद्वारे या कंपनीच्या नावाने असलेल्या बँक खात्यात तसेच त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर ३७ गुंतवणूकदारांची रक्कम स्वीकारली. प्रत्यक्ष मुदत ठेवीच्या मुदतपूर्तीनंतर कोणताही परतावा अथवा मूळ मुद्दल रक्कम परत न करता या सर्व गुंतवणूकदारांची दोन कोटी ५६ लाख ३७ हजारांची आर्थिक फसवणूक केली.

दरम्यान, याप्रकरणी अलीकडेच त्यांच्याविरुद्ध चितळसर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

यातील मुख्य आरोपी तुषार साळुंखे यास गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे आणि उपायुक्त सुनील लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जगदीश पन्हाळे यांच्या पथकाने २३ फेब्रुवारी २०२२ रोजी अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.