जिल्ह्यात पुन्हा कडाक्याची थंडी

0

जिल्ह्यात पुन्हा कडाक्याची थंडी
जळगावचा पारा ९.४ अंशांवर; आठवडाभर गारठा कायम राहणार

जळगाव – शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी घसरण होत असून थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दोन दिवसांपासून शीतलहरींचा जोर वाढल्याने आज पुन्हा किमान तापमान ९.४ अंश सेल्सिअसवर घसरले आणि जिल्ह्यात गारठा आणखी तीव्र झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील आठवडाभर थंडीचा जोर कायम राहणार असून काही भागांत तापमान ८ अंशांपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे.

शहरात गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमान १० अंशांखालीच असल्याने सकाळी व रात्रीच्या वेळेस हुडहुडी भरवणारी थंडी जाणवत आहे. पहाटे धुके आणि गार वाऱ्यांचा जोर कायम असून दिवसभर उन्हाचे चटके जाणवत आहेत. दुपारी कमाल तापमान २८ ते ३० अंशांच्या दरम्यान असून रात्रीचे किमान तापमान १० ते १२ अंशांभोवती आहे.

थंडी वाढल्याने शहरासह ग्रामीण भागात शेकोट्यांना ऊत आला आहे. मॉर्निंग वॉकला जाणारे नागरिक, नोकरदार, विद्यार्थी उबदार कपड्यांचा आश्रय घेताना दिसत आहेत. शाळकरी मुलांवर थंडीचा जास्त परिणाम होत असल्याने सर्दी–खोकल्याच्या तक्रारीही वाढू लागल्या आहेत.

खान्देशात काही ठिकाणी तापमानात चढ-उतार दिसत असले तरी जळगावात सलग गारठ्याचा प्रभाव कायम आहे. तापमानात अचानक झालेल्या घसरणीमुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.