महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यांमध्ये थंडीचा कहर ; निफाडमध्ये ४.२ अंश सेल्सिअस
विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि नाशिक जिल्ह्यांत थंडीची लाट
महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यांमध्ये थंडीचा कहर ; निफाडमध्ये ४.२ अंश सेल्सिअस
विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि नाशिक जिल्ह्यांत थंडीची लाट
पुणे वृत्तसंस्था : महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि नाशिक जिल्ह्यासह २३ जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी घसरण झाली असून, थंडीच्या लाटेसदृश स्थिती निर्माण झाली आहे. बुधवार (दि. ५ मार्च) पासून पहाटेच्या वेळी किमान तापमानात अचानक घट झाली.नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे काल सर्वात नीचांकी ४.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले, तर आज ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
थंडीचा प्रभाव कोठे जाणवतोय?
महाराष्ट्रातील अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून थंडीच्या लाटेसदृश स्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये विशेषतः अहिल्यानगर, जळगाव, नाशिक व परिसरातील जिल्हे थंडीच्या कचाट्यात सापडले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ही थंडीची लाट येत्या शनिवार (दि. ८ मार्च) पर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही थंडी का वाढली?
थंडी वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे उत्तर भारतातून थंडी घेऊन येणाऱ्या थंड वाऱ्यांचे महाराष्ट्राकडे वाढते वहन.गेल्या दीड महिन्यापासून (२५ जानेवारीपासून) बंगालच्या उपसागरातून दमट व आर्द्रतायुक्त वारे वाहत होते.या वाऱ्यांमुळे उत्तर दिशेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना अटकाव होत होता.मात्र, बुधवार (५ मार्च) पासून वाऱ्यांच्या प्रणालीत बदल झाला आणि थंड वाऱ्यांनी महाराष्ट्रात प्रवेश केला.यामुळे तापमानात अचानक घसरण झाली आणि राज्यातील २३ जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट जाणवू लागली.
थंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी सूचना
गरम कपड्यांचा वापर करावा. पहाटे आणि रात्री बाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी.लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी थंडीपासून बचावासाठी विशेष खबरदारी घ्यावी. सकाळच्या थंडीत व्यायाम किंवा फिरण्यासाठी बाहेर पडताना गरम कपडे घालावेत.उष्ण पेये व आहारात गरम पदार्थांचा समावेश करावा.
महाराष्ट्रात अजूनही काही दिवस थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.