घरात बसून राहणारे उद्धव ठाकरे तुमची काळजी घेणार नाहीत!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा हल्लाबोल : चाळीसगाव सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

 

चाळीसगाव

कोरोना काळात सर्व राज्याचे मुख्यमंत्री घराबाहेर पडून जनतेच्या आरोग्याची काळजी घेत होते मात्र महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसून होते. संकटाच्या काळात भाजपाने जनतेला मदत केली, घरात बसणारे लोक तुमची काळजी घेणार नाहीत असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. चाळीसगाव येथे महायुतीचे उमेदवार आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार किशोर पाटील, उमेदवार अमोल पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.  श्री. शाह म्हणाले की, काँग्रेस, शरद पवार, उद्धव ठाकरे हे एकत्र लढत आहे मात्र राहुल बाबा सावकारांचा विरोध करीत आहे. तरी उद्धव ठाकरे यांच्यात दम असेल तर त्यांनी राहुल गांधी यांच्याकडून सावरकर यांच्या बद्दल दोन शब्द चांगले बोलून दाखवावेत असे खुले आव्हान अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना दिले. महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना शिंदे गट व अजित पवार यांची राष्ट्रवादी हे शिवाजी महाराजांच्या सिद्धांतांवरच एकत्र आले. या राज्याला नंबर वन करायचे आहे, त्यासाठीच महायुती सरकार व युती गटबंधन तयार झाले आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी मतदारसंघाचा चौफेर विकास केला असून सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी मंगेश चव्हाण यांना विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्रातील संस्कृती, संस्कार जपण्यासाठी युतीचे सरकार बनले आहे. काश्मिरमधील कलम 370 हटविण्याच्या गप्पा केल्या जात असल्या तरी हे कलम कुणीही रद्द करु शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या युती सरकारने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजी नगर ठेवले त्यावेळेस याच आघाडीवाल्यांनी त्याला विरोध केला. राम मंदिर बनवण्यासाठी यांचा विरोध, ट्रिपल तलाक हटवण्यासाठी यांचा विरोध, 370 कलम हटवण्यासाठी यांचा विरोध आणि आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्फ बोर्ड याचा कानून बदलण्याचा निर्णय घेतला त्यालाही आघाडीने विरोध केला. राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्र नंबर वन ला जाईल असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला.

यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उमेदवार मंगेश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी उन्मेष पाटील यांचा खरपूस समाचार घेतला. सभेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Leave A Reply

Your email address will not be published.