लोकशाही न्यूज नेटवर्क
मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. ठाकरेसेनेने ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली. शिवसेना ठाकरे गटाने अनेक दिग्गजांना संधी दिली आहे. रविवारी रात्रभर मातोश्रीवर उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी स्वत: उमेदवारांची भेट घेत त्यांना एबी फॉर्म दिला. हे सर्व उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करतील.
शिवसेना ठाकरे गटाने ४५ उमेदवारांची यादी आज जाहीर केली आहे. उर्वरीत उमेदवारांची नावं देखील जाहीर करण्यात येतील. ठाकरे गटाकडून ९० जणांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. आज उर्वरीत उमेदवारांना एबी फॉर्म दिले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शिवसेना ठाकरे गटाने अनेक दिग्गज नेत्यांच्या मुलांना आणि नातेवाईकांना निवडणूक लढवण्याची संधी दिली आहे.
माजी खासदार आणि पक्षाचे सचिव विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश राऊत याला वॉर्ड क्रमांक 89 मधून उमेदवारी मिळाली आहे. आमदार सुनील प्रभू यांचा मुलगा अंकित प्रभू याला वॉर्ड क्रमांक 54 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. आमदार हारून खान यांची मुलगी सबा हारून खान हिला वॉर्ड क्रमांक 64 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर माजी आमदार प्रकाश फातर्पेकर यांची मुलगी सुप्रदा फातर्पेकर हिला वॉर्ड क्रमांक 150 मधून उमेदवारी देण्यात आली आहे.