लोकशाही संपादकीय लेख
सात आठ वर्षांपूर्वी टेक्सटाईल पार्क जामनेर येथे होणार असे गिरीश महाजन यांनी जाहीर केले होते. परंतु मध्यंतरी हे टेक्सटाईल पार्क अमरावती जिल्ह्यात नेण्यात आल्याचे सांगण्यात आले. आता नगरपालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जळगाव जिल्ह्यात भुसावळ येथे एकमेव जाहीर सभा झाली. त्या सभेत मुख्यमंत्र्यांनी भुसावळ येथे टेक्स्टाईल पार्क करण्याची घोषणा केली होती. त्यावेळीच व्यासपीठावर बसलेले मंत्री गिरीश महाजन म्हणाले होते, जामनेरला टेक्सटाईल पार्क द्या… वगैरे… वगैरे.. ही जाहीर सभा जळगाव जिल्ह्यात एकमेव भुसावळ येथेच घेण्यात आली. तथापि ज्या ज्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा झाली तेथे युतीचे उमेदवार विजयी झाले. परंतु भुसावळ मध्ये संजय सावकारे यांच्या पत्नी पल्लवी सावकारे थेट नगराध्यक्ष निवडणुकीत पराभूत झाल्या, हे विशेष होय. त्याचबरोबर ज्या टेक्स्टाईल पार्कची घोषणा भुसावळसाठी मुख्यमंत्र्यांनी केली होती ते टेक्स्टाईल पार्क सुद्धा जामनेरला पळवण्यात आले. स्वतः वस्त्रोद्योग मंत्री असतानाही सावकारे साधे टेक्सटाइल पार्क भुसावळमध्ये आणू शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. शेवटी समाधानाची बाब म्हणजे कुठे का होईना, टेक्स्टाईल पार्क अखेर जळगाव जिल्ह्यात होतो आहे, ही समाधानाची बाब आहे, असे म्हणून समाधान व्यक्त केले जात आहे. याचा अर्थ वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी ही बाब प्रतिष्ठेची करायला पाहिजे, असा त्याचा अर्थ नाही. परंतु जामनेर पेक्षा भुसावळ हे ठिकाण सर्वच दृष्टीने टेक्स्टाईल पार्कसाठी सोयीचे होते. भुसावळला रेल्वेचे जंक्शन आहे. त्यानुसार त्यामुळे रेल्वेचे हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात जाळे पसरलेले आहे. म्हणजे वाहतुकीच्या दृष्टीने रेल्वेचे जाळे सोयीचे होते. भुसावळला नागपूर हायवे आहे. हा हायवे मुंबई ते नागपूर असल्या दोन मोठ्या शहरांना रस्त्यांची जोडणी करणारा हायवे असल्याने सोयीचे होते. त्यानंतर दिपनगर हे विद्युत केंद्र भुसावळ लगत असताना टेक्सटाईल पार्कसाठी लागणारी वीज सहजरीत्या उपलब्ध झाली असती. त्याचबरोबर तापी नदी भुसावळ लगतहून वाहते त्यामुळे टेक्स्टाईल पार्कसाठी लागणारे मुबलक पाणी देखील भुसावळला उपलब्ध झाले असते. अशा प्रकारच्या सर्व सोयींनी युक्त भुसावळ शहर असताना ते टेक्सटाइल पार्क जामनेरला हलविण्यात आले, ही बाब खटकणारी आहे. त्यातच भुसावळ या ठिकाणी कोणत्याही महत्त्वाचा उद्योग नाही. त्यामुळे टेक्स्टाईल पार्कच्या नावाने एक मोठा प्रकल्प भुसावळला आला असता आणि त्या सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा उद्योगामुळे तो प्रकल्प चांगला चालू शकला असता. परंतु वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी खुद्द भुसावळात नाही तर जामनेर प्रकल्प शेवटी जळगाव जिल्ह्यातच असल्याने समाधान व्यक्त केले ही बाब सुद्धा विशेष महत्त्वाची आहे. अशा प्रवृत्तीमुळे गेले पंधरा वर्षे झाले. भुसावळ शहराचा विकास होऊ शकला नाही, एवढ्या मोठ्या सुविधा असताना एकदाही मोठा प्रकल्प भुसावळला येऊ शकला नाही. रेल्वे, हायवे, पाणी, जमीन, वीज त्या सर्व काही गोष्टी असतानाही तेथे एकदाही उद्योग येऊ नये ही खेदाची बाब आहे. एवढेच काय गेल्या दहा वर्षात अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम द्रुतगतीने करण्यात संजय सावकारे कमी पडले आहेत. पंधरा वर्षात दोनदा मंत्रिपद त्यांच्याकडे आले, याचा काहीही उपयोग नाही ही बाब तितकीच स्पष्ट आहे.
जामनेरला होणारे टेक्स्टाईल पार्क हे अमरावतीत गेले होते. ते तेथून खेचून आणण्यात गिरीश महाजन यशस्वी ठरले असे म्हणायला मात्र हरकत नाही. जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस पिकतो. कापसावर प्रक्रिया करून त्याचे कापड मध्ये रूपांतर होणे हे एका छताखाली महत्त्वाचे आहे. टेक्स्टाईल पार्क मुळे स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांचा कापूस बाहेरच्या जिल्ह्यात निर्यात न होता तो जिल्ह्यातच विक्री होणार. त्याचबरोबर जिल्ह्यात वाहतुकीचा खर्च कमी असल्यामुळे कापसाला चांगले भाव मिळतील ही वस्तुस्थिती आहे. काही का असेना गिरीश महाजन यांनी भुसावळला मंजूर झालेली सूतगिरणी जामनेरला नेली हा त्यांच्या कौशल्याचा भाग आहे. त्या मागे मागासलेल्या जामनेर तालुक्यात टेक्स्टाईल पार्कमुळे त्याला चांगले दिवस येतील हेही तितकेच खरे. स्थानिक लोकांना रोजगार मिळेल, स्थानिक व्यापाऱ्यांना व्यापाराची संधी मिळेल, व्यापाराची उलाढाल होईल, एकाच छताखाली कापसावर होणाऱ्या सर्व प्रक्रियांमुळे चहल- पहल वाढेल मुख्य मुद्दा म्हणजे जामनेर ही कापडासाठीची बाजारपेठ म्हणून नावलौकिक होईल. कापसावर प्रक्रिया होऊन तयार कापड बाजारात येईलच परंतु निरनिराळ्या प्रकारचे तयार केलेले कापड तेथे निर्माण होतील. अशा एका उद्योगामुळे तालुक्याची आर्थिक भरभराट होऊन सुभत्ता येईल यात शंका नाही. आता घोषणा तर झाली. भुसावळ की जामनेर हे निश्चित झाले. आता तातडीने त्याच्या कामाला सुरुवात होणे महत्त्वाचे आहे. अन्यथा घोषणा कागदावरच राहिल्या तर त्याला काही अर्थ राहणार नाही. त्यासाठी तातडीने टेक्सटाइल पार्कच्या कामाला सुरुवात होणे महत्त्वाचे आहे…!

