टीईटी गैरव्यवहार प्रकरण : पात्र शिक्षकांची कुंडली लवकरच उघड

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

पुणे : शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) अपात्र असताना देखील पात्र झालेल्या उमेदवारांची कुंडली लवकरच पोलिसांच्या हाती मिळणार आहे.गैरव्यवहारात पोलिसांना आढळून आलेल्या सात हजार 880 उमेदवारांपैकी किती जण सध्या शिक्षक म्हणून नोकरी करीत आहेत, याची माहिती गोळा करण्यासाठी पोलिसांनी शिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे.

त्याची माहिती लवकरच मिळण्याची शक्यता आहे.

तसेच, 2018 मध्ये पात्र नसताना पात्र केलेल्यांची माहिती काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे हेराफेरी करून पात्र झालेल्या शिक्षकांची चांगलीच पंचाईत होण्याची शक्यता आहे.

पुणे पोलिसांच्या सायबर सेलने टीईटी गैरव्यवहार प्रकरणात आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर, राज्य शिक्षण परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे, शिक्षण विभागाचा सल्लागार अभिषेक सावरीकर, जी. ए.

सॉफ्टवेअरचा संचालक डॉ. प्रीतीश देशमुख, माजी संचालक आश्विन कुमार व इतर एजंट यांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांना 2019-20 च्या टीईटी परीक्षेमध्ये पात्र नसतानाही सात हजार 900 उमेदवार पात्र ठरविल्याचे समोर आले होते.

तसेच, सायबर पोलिसांकडून केलेल्या तपासात 2018-19 मध्ये झालेल्या टीईटीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. या परीक्षेत अपात्र असलेल्या किती उमेदवारांना पात्र केले, याची माहिती काढण्याचे काम सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.