गद्दारांचा हिशोब जनताच निवडणुकीत करणार

वैशाली सुर्यवंशी यांचा घणाघात : पिंपळगाव हरेश्वर येथे शेतकरी मेळाव्यात विकासाची ग्वाही

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

”निवडणुकीपर्यंत सर्वांना लाडकी बहिण आठवणार आहे. निवडणुकीच्या नंतर मात्र माझ्यासारखी बहिणच आपल्या उपयोगात येणार आहे. तर गद्दारांचा हिशोब ही जनताच निवडणुकीत करणार आहे !” अशा शब्दात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र सोडले. त्या पिंपळगाव हरेश्वर येथील शेतकरी मेळाव्यात बोलत होत्या.

 

शेतकरी शिवसंवाद यांच्या अंतर्गत पिंपळगाव हरेश्वर येथील महात्मा फुले मंगल कार्यालय (माळी ) या सभागृहात आज शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यात प्रारंभी प्रदीप पाटील, रमेश बाफना व डी. आर. महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर जळगावच्या कृषी विज्ञान केंद्राचे मोसंबी तज्ज्ञ डॉ. किरण जाधव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यात प्रामुख्यान मोसंबीसह लिंबूवर्गीय फळबागांच्या माध्यमातून कुणीही आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने चांगले उत्पादन घेऊ शकत असल्याचे त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून सखोल मार्गदर्शन केले.

 

यानंतर पिंपळगाव हरेश्वर, आंबेवडगाव येथील पन्नास पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांनी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. वैशाली सुर्यवंशी यांनी या सर्वांचे स्वागत केले. याप्रसंगी वैशाली म्हणाल्या की, ”उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री असतांना कपाशीला बारा हजारांचा भाव मिळाला, नंतर हा भाव कधीच मिळाला नाही. आपला नेता आजाराशी झुंज देत असतांना ४० जणांनी त्यांच्याशी गद्दारी करत त्यांचा पक्ष, चिन्ह आणि सत्ता हिसकावून घेतली असून राज्यातील जनता विधानसभा निवडणुकीत यांचा हिशोब चुकता करणार आहे. पाचोरा मतदारसंघ विकासापासून कोसो दूर आहे. मतदारसंघातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. विकासाबाबतीत कोणतीही दुरदृष्टी नसल्यामुळे कामे झाली नाहीत. मी निवडून आल्यास मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटीबध्द राहिल” असे प्रतिपादन त्यांनी केले.

 

याप्रसंगी व्यासपीठावर उध्दव मराठे, अरूण पाटील, अॅड. अभय पाटील, रमेश बाफना, बी. आर. महाजन, भास्कर नाथ, ज्ञानेश्वर पाटील, भारत क्षीरसागर, हिलाल पाटील, तिलोत्तमा मौर्य, सिकंदर तडवी, अण्णा परदेशी, अरुण तांबे, अजय तेली, योगेश बडगुजर, कोमल देशमुख, कैलास क्षीरसागर, शांताराम पाटील, भाऊसाहेब पाटील, राजेंद्र देवरे, अरूण तांबे, विजया मालकर, चंद्रकला क्षीरसागर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.