तो जीवंत असेल तर गोळी मारा..!

दहशतवादी आदिलच्या आईची प्रतिक्रिया : सुरक्षा दलाकडे केली मागणी

0

श्रीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्यानंतर भारतीय सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन करत मोठी कारवाई केली. पर्यटकांवर गोळीबार करणारा दहशतवादी आदिलच्या घरावर सुरक्षा दलाने बुलडोझर चालवला. त्यानंतर आता त्याच्या आईने एक मागणी केली आहे. जर तो जीवंत असेल, तर त्याला गोळी मारा, असे दहशतवादी आदिलची आई शहजादा बानो यांनी म्हटले आहे.

जर आपल्या मुलाची या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भूमिका असेल, तर सुरक्षा दलाला जे काही करायचे आहे ते करण्याचा अधिकार आहे. त्याचे एन्काऊंटर करायचे तर ते करा, असे त्या म्हणाल्या. दहशतवादी आदिलची आई शहजादा बानो यांनी सांगितले, की 2018 मध्ये आदिल घरातून गेला ते कधीच परत आला नाही. तेव्हापासून त्याच्यासोबत माझे कधीही बोलणे झाले नाही. आदिल जर जीवंत असेल तर त्याने आत्मसमर्पण करावे, त्याच्यामुळे आम्हाला त्रास होत आहे. गुरुवारी संध्याकाळी सुरक्षा दल घरी आले होते. त्यांनी मला एक फोटो दाखवला पण फोटोतील हा आदिल नसल्याचे मी सांगितले.

दरम्यान, आदिलचे घर सुरक्षा दलाकडून बुलडोझरने उडवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, आदिल 2018 मध्ये कायदेशीररित्या पाकिस्तानला गेला होता. त्याने पाकिस्तानमध्ये जात दहशतवादी प्रशिक्षण घेतल्याचा आरोप त्याच्यावर आहे. 2018 नंतर तो 2024 मध्ये, गेल्या वर्षीच जम्मू आणि काश्मीरला परतला होता, अशी माहिती आहे. त्यानंतर आता 2025 मध्ये तो पहलगाम हल्ल्यात गोळीबार करताना दिसून आला. सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचे स्केच जारी करण्यात आले. त्यात आदिलचा फोटो दिसतो आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.