नागपूर
विधानसभा निवडणुकीसाठी होत असलेल्या मतदान प्रक्रियेत पैसे वाटप करण्याच्या कारणावरून अनेक ठिकाणी गोंधळ निर्माण होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. असाच प्रकार मध्य नागपूर मतदारसंघातील बांगलादेश परिसरात समोर आला असून काँग्रेस उमेदवाराकडून पैशांचे पाकीट वाटप केले जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आज मतदान प्रक्रिया राबविली जात आहे. सकाळपासून मतदान सुरु झाले असून अनेक ठिकाणी गोंधळ निर्माण झाल्याचे प्रकार सुरु आहेत. तर एकमेकांच्या विरोधात असलेल्या उमेदवार व कार्यकर्त्यांकडून पैसे वाटपाचे आरोप देखील केले जात आहेत. असाच प्रकार आता मध्य नागपूर मतदारसंघात समोर आला असून भाजपकडून काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचार कार्यालयात काही लोक लिफाफे घेऊन पैसे वाटत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
काँग्रेसचे उमेदवार शेळके यांच्या प्रचार कार्यालयात वाटप होत असलेले पैसे हे मतदारांना वाटण्यासाठी आणले असल्याचा भाजपचा आरोप आहे. यामुळे याठिकाणी प्रचंड गोंधळ उडाला असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व प्रकरणानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तर या ठिकाणी निवडणूक विभागाचे अधिकाऱ्यांनी काही जणांना ताब्यात घेत सोबत नेले आहे.