जळगाव | शहरातील रामेश्वर कॉलनीत मंगळवारी (२२ जुलै) रात्री सुमारे ९ वाजता स्वामी समर्थ चौकात दोन गटांत किरकोळ कारणावरून दगडफेक झाली. यामध्ये दोन तरुण किरकोळ जखमी झाले असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून रामेश्वर कॉलनीत दोन गटांत कुरबुरी सुरू होत्या. मंगळवारी रात्री काही तरुण स्वामी समर्थ चौकातील एका अपार्टमेंटजवळ उभे असताना, अचानक दुचाकीवर आलेल्या १० ते १२ जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर दगडफेक केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि परिसरात पळापळ झाली.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून गेले. पोलिसांच्या तत्परतेमुळे अधिक अनर्थ टळला.
या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी सांगितले की, एका मेडिकल स्टोअरवरील किरकोळ वादातून ही दगडफेक झाली. सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत असून, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे.