भडगाव : येथील कर्मवीर तात्यासाहेव हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था अंतर्गत असलेल्या सर्व विद्यालये, महाविदयालये यातील कर्मचारी व शिक्षक हे भडगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारात दिसून येत असून शैक्षणिक कामे सोडून कर्मचाऱ्यांना प्रचारासाठी जुंपल्याने संस्था व कर्मचाऱ्यांवर कारवार्इ करावी अशी तक्रार लखिचंद पाटील यांनी केली आहे.
भडगाव येथील प्रभाग क्र.8(अ) मधील उमेदवार पूनम प्रशांत पाटील यांच्या प्रचारार्थ बेकायदेशीरित्या प्रभागात फिरत प्रचार करत असल्याने त्यांचे विरुद्ध व सर्व संबंधितांचे विरुद्ध योग्य ती कायदेशीर कार्यवाही व्हावी असे लेखी तक्रार भडगाव येथील लखिचंद प्रकाश पाटील यांनी राज्य निवडणूक आयोग मुंबई यांच्यासह विविध विभागीय कार्यालयांकडे केली आहे. याबाबत लेखी तक्रारी अर्जात नमूद करण्यात आले आहे की, भडगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 लागली असून सदर निवडणूक मध्ये प्रभाग क्र.8(अ) सर्वसाधारण महिलासाठी राखीव असून सदर जागेसाठी त्या प्रभागात समीक्षा लखिचंद पाटील यांनी शिवसेना पक्षातर्फे नामनिर्देशनपत्र दाखल केले असून त्यांना उमेदवार म्हणून संबोधित केले आहे.
तसेच प्रभाग क्र. 8(अ) या जागेसाठी पूनम प्रशांत पाटील यांनी भारतीय जनता पार्टीतर्फे नामनिर्देशनपत्र दाखल केलेले असून उमेदवारी करीत आहे. ते प्रतिस्पर्धी उमेदवार आहे.
त्यांची कर्मवीर तात्यासाहेव हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था, भडगाव हि शैक्षणिक संस्था असून त्यांचे संपूर्ण भडगाव तालुक्यामध्ये विविध गावी प्राथमिक विद्यालये, माध्यमिक विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालये आहेत. सदर संस्था शासकीय अनुदानित संस्था आहे. या संस्थेस यापुढे ‘सदर संस्था’ म्हणून संबोधित केलेले आहे. संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील हे असून त्यांना ‘चेअरमन’ म्हणून संबोधित केले आहे. सदर संस्थेमध्ये अनेक शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य व शिक्षकेत्तर कर्मचारी नोकरीस आहेत. पूनम प्रशांत पाटील या प्रतापराव हरी पाटील यांची सुकन्या आहे असे असताना चेअरमन हे त्यांचे पुत्रीचे उमेदवारी व निवडणूक कामी कोणतीही तजवीज करण्याकामी व प्रचारार्थ सदर संस्थेचे कर्मचारी यांचा वापर करीत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
कर्मचाऱ्यांची शाळेत हजेरी अन् प्रचारात सहभाग
या संस्थेचे कर्मचारी हे त्यांचे कार्यालयीन वेळेत शाळेत हजर असल्याचे दाखवून पूनम पाटील यांचे प्रचारार्थ प्रभागात फिरत आहेत. सदर कर्मचारी हे त्यांचे प्रतिदिन कामकाज पार न पाडता कर्तव्यात कसूर करीत आहेत. त्यामुळे शाळेतील मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सदर कर्मचारी हे त्यांचे शाळेतील हजेरी लावून झाल्यानंतर शाळेत कर्तव्य न करता पूनम पाटील यांचे प्रचारार्थ फिरत आहे. सदर कर्मचारी हे शासकीय कर्मचारी असून शासनाचा पगार घेवून चेअरमन व त्यांचे पुत्रीचे वैयक्तिक लाभासाठी व पक्षासाठी काम करीत आहेत. चेअरमन देखील त्यांचे वैयक्तिक व कौटुंबिक लाभासाठी कर्मचाऱ्यांचा दुरुपयोग करीत असून त्यांच्यावर कारवार्इ करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
‘‘ संस्था चालक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा दुरुपयोग करुन त्यांना प्रचार करण्यास भाग पाडत आहेत. शिक्षक आपले कर्तव्य सोहऊन राजकारण करीत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत माझ्याकडे पुरावा व व्हिडीओ असून सदर शिक्षक व कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी लेखी तक्रार आयोगाकडे पुराव्यानिशी करण्यात आलेली आहे.
– लखिचंद पाटील, तक्रारदार

