तनिशा भिसे मृत्यू प्रकरण: चौकशी अहवालात रुग्णालय प्रशासन दोषी, डॉ. सुश्रुत घैसासांचा राजीनामा
पुणे (प्रतिनिधी): ;- भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिशा भिसे यांचा मृत्यू दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या अडवणुकीमुळे झाला, असा गंभीर आरोप भिसे कुटुंबीयांनी केला होता. गर्भवती असलेल्या तनिशा यांना उपचारांपूर्वी १० लाख रुपयांची अनामत रक्कम मागितल्याने विलंब झाला आणि त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला, असा दावा करण्यात आला होता.
या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली होती. तीव्र जनक्षोभानंतर राज्य सरकारने चौकशी समिती नेमली होती. आज (७ एप्रिल) या समितीचा अहवाल समोर आला असून, त्यामध्ये रुग्णालय प्रशासनावर गंभीर ठपका ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावरही आरोप करण्यात आले होते. भिसे कुटुंबियांच्या मते, डॉ. घैसास यांनीच अनामत रक्कम भरल्याशिवाय उपचार सुरू करणार नसल्याची अट घातली होती. चौकशीच्या प्रक्रियेत सतत येणाऱ्या तणावामुळे अखेर डॉ. घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले आहे.
या प्रकरणावर आमदार अमित गोरखे यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, “ही एक अतिशय वेदनादायक आणि निषेधार्ह घटना आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून कठोर कारवाई होणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले. तसेच, सामाजिक क्षेत्रातील अनेकांनीही आरोग्य व्यवस्थेतील अशा हलगर्जीपणावर नाराजी व्यक्त केली आहे.
चौकशी अहवालानंतर राज्य सरकारने या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. या प्रकारातून खासगी रुग्णालयांच्या आर्थिक दडपशाहीविरुद्ध जनतेत संताप वाढला आहे. आता या घटनेनंतर आरोग्य यंत्रणेमध्ये सुधारणा होतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.