लोकशाही संपादकीय लेख
तब्बल गेले दहा दिवस गणरायाच्या आगमनानंतर गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाचे श्री गणेशाचे स्वागत केले. सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने विविध प्रकारच्या देखाव्यांची आरास करून भक्तांना मेजवानी दिली. यंदा गणराया नाचत गाजत पाऊस घेऊन आला. दहा दिवसांमध्ये फक्त तीन-चार दिवस पावसाने उघडीप घेतल्याने भक्तांना गणेश दर्शन घेता आले. गेले तीन दिवस तर दिवसभर संततधार पाऊस चालू आहे. गणरायाने पावसाची कमतरता दूर केली. एवढ्याच नव्हे तर आता “पाऊस थांबव गणेशा..” असे म्हणण्याची वेळ आली आहे. गेले 10 दिवस गणेश भक्तांनी अत्यंत शांततेत उत्सव साजरा केला. कुठेही गडबड गोंधळ अथवा गणेशोत्सवाला गालबोट लागेल असे कृत्य गणेश भक्तांच्या हातून झालेले नाही. गणरायाच्या आगमनापासून ते शनिवारी विसर्जनापर्यंत जळगाव शहर आणि जिल्ह्यात भक्तिमय वातावरण होते. जळगाव शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी जी काही विघ्ने आहेत ती दूर कर.. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या दूर करून शेतकरी राजाला सुखी आणि आनंदी ठेव.. निसर्गाकडून येणाऱ्या विघ्नांना पायबंद घाल.. अतिवृष्टी पण नको आणि पावसाची कमतरता पडेल असेही नको.. जेवढे खरीप आणि रब्बी पिकासाठी आवश्यक पाऊस असेल तेवढाच पाऊस दे.. शेतकऱ्यांची पिके उत्तमरीत्या बहरू दे.. भरपूर उत्पादन होऊ दे.. त्याच्या उत्पादित मालाला योग्य असा भाव मिळू दे.. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या आता यापुढे होणार नाहीत याची काळजी घे.. तुझ्या विसर्जनाबरोबर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचेही विसर्जन होऊ दे.. तुला आनंदाने निरोप देताना आमच्यावरील सर्व संकटे आणि विघ्ने दूर कर.. हीच तुझ्या चरणी मागणी. गेले दहा दिवस सर्व काही, तहानभूक विसरून तुझ्यासाठी लीन झालो. आता तुझ्या विसर्जनाबरोबर सर्व संकटांचेही विसर्जन कर.. जळगाव जिल्ह्यात चोपडा व यावल येथील पाच दिवसाच्या गणरायाचे थाटात विसर्जन झाले. आता शनिवारी तुझ्या विसर्जनासाठी आम्ही सज्ज आहोत.
गेले दहा दिवस जळगाव शहरात तसेच जिल्हाभरात विविध प्रकारच्या देखाव्यांच्या दर्शनाने अनेक प्रकारचे संदेश देण्यात आले. अनेक ठिकाणी अध्यात्मावर भर देणाऱ्या देखाव्यांमधून अध्यात्माचा संदेश दिला गेला. काही ठिकाणी विज्ञानावर भर देणाऱ्या देखाव्यांची आरास मन आकर्षित करून गेली. अनेक मंडळाच्या वतीने पर्यावरण पूरक बाबींचे दर्शन घडविण्यात आले. आपल्याला सुंदर जीवन जगायचे असेल तर पर्यावरणाची जोपासना करणे आवश्यक आहे. झाडे लावा झाडे जगवण्याचा संदेश देणारे देखावे आपले आयुष्य जगविण्याचा संदेश देत होती. या संपूर्ण दहा दिवसांच्या गणेशोत्सवा काळात कोणत्याही गणेश मंडळाकडून समाजात तेढ निर्माण होईल, असे देखावे नव्हते हे विशेष. अन्यथा अलीकडे हिंदुत्वाच्या अतिरेकातून काही गणेश भक्तांकडून तो अतिरेक होतो. परंतु यंदा या गणेशोत्सवात असे हिडीस दर्शन कोठे दिसले नाही, ही अत्यंत अभिमानाची व स्वाभिमानाची बाब आहे असे म्हणता येईल. उद्या दुपारपासून श्री गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होऊन रात्री बारा वाजेच्या आत गणेशाचे विसर्जन शांततापूर्ण वातावरणात पार पाडायचे आहे. गेले दहा दिवस जी शांतता पाळली, जो संयम बाळकला, तशीच शांतता श्री गणेशाच्या निरोपाच्या मिरवणुकीतही ठेवावी. काही माथेफिरू मंडळी गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, पण त्याला बळी पडू नका. काही संवेदनशील ठिकाणी काहीतरी गडबड गोंधळ करण्याचा प्रयत्न होईल, त्याला हाणून पाडा आणि गेले दहा दिवसात जी शांतता बाळगली तशीच शांतता विसर्जनाच्या मिरवणुकीतही बाळगा. गणेश भक्तांची मान उंचावेल असेच कृत्य करून आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देऊया..!