लोकशाही न्यूज नेटवर्क

ज्या महिला सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतात त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सरकारने सुरू केलेली लक्ष्मी योजना ही सध्या चर्चेच आहे. याच संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. आता १ सप्टेंबरपासून महिलांच्या खात्यात दरमहा २,५०० रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. योजनेच्या लाभार्थींना २७ ऑगस्ट रोजी तालकरोगा स्टेडियम येथे आजोजित विशेष कार्यक्रमात अधिकृत पत्र देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिली.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्ली सचिवालयात लक्ष्मी योजनेच्या अंमलबजावणीबद्दल आढावा बैठक घेतली. या बैठकीला मुख्य सचिव राजीव वर्मा तसेच जिल्हास्तरीय स्वीकृती, देखरेख आणि तक्रार निवारण समित्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. दिल्ली लक्ष्मी योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळावा, यासाठी प्रत्येक अर्जाची सखोल तपासणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अर्जातली माहिती संशयास्पद असेल तर तिची योग्य प्रकारे पडताळणी केली जाईल. तपासणीची प्रोसेस लवकरात लवकर पूर्ण झाल्याने पात्र लाभार्थींच्या अर्जांवरही लवकर निर्णय घेता येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
अर्ज भरताना काही पात्र महिलांकडून चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिली गेली तर त्यांना दुरुस्तीची आणखी एक संधी मिळणार आहे. यासाठी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर लवकरच स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे अर्जात चूक झालेल्या पात्र महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या माहितीनुसार, योजना सुरू झाल्यानंतर फक्त १८ दिवसात ८ लाख महिलांनी पोर्टलवर नोंदणी केली आहे. यापैकी ५ लाखांपेक्षा जास्त अर्ज अंतिम टप्प्यात जमा झाले आहेत.
कमी कालावधीत मिळालेला हा प्रतिसाद उल्लेखनीय असल्याचं मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितलं. पात्र महिलांना योजनेचा लाभ नियमितपणे मिळावा आणि प्रक्रियेत कोणताही अनावश्यक उशीर होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून अर्जांची तपासणी आणि देखरेख केली जात आहे.


