शाश्वत आणि जैविक शेती काळाची गरज!
केसीई सोसायटी आणि कृषी विभागाचा संयुक्त उपक्रम : 'मृदा आणि पाणी तपासणी' अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
शेतीमध्ये सातत्याने होणारा रासायनिक खतांचा वापर आणि बदलत्या हवामानामुळे मातीचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी ‘माती परीक्षण’ आणि ‘जैविक शेती’ ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन कृषी क्षेत्रातील मान्यवरांनी केले. मृदेचे (मातीचे) महत्त्व आणि तिचे संवर्धन याबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी, मूळजी जेठा महाविद्यालयाचा ‘करियर कट्टा’ विभाग आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “आंतरराष्ट्रीय मृदा दिन” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी कृषी अधिकारी आणि शास्त्रज्ञांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना व उपस्थितांना मार्गदर्शन केले. शाश्वत शेती आणि मृदा संवर्धन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना तज्ज्ञांनी शाश्वत शेती या संकल्पनेवर विशेष भर दिला. केवळ उत्पादन वाढवणे हे ध्येय नसून, जमिनीचे आरोग्य दीर्घकाळ टिकवणे महत्त्वाचे आहे. यासाठी मातीची सुपीकता वाढवणे आवश्यक असून, शेतकऱ्यांनी आणि कृषी अभ्यासकांनी जैविक शेती पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. पिकांच्या भरघोस उत्पादनासाठी आधी आपल्या शेतातील मातीचे आरोग्य तपासणे म्हणजेच माती परीक्षण करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शमा सराफ यांनी तर कार्यक्रमाची भूमिका डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी मांडली.
महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांनी ‘मृदा आणि पाणी तपासणी’ हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला, त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. भविष्यात या विद्यार्थ्यांचे योगदान कृषी क्षेत्रासाठी मोलाचे ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य संजय भारंबे होते. प्रमुख पाहुणे म्हणून केसीई सोसायटीच्या शैक्षणिक संचालिका डॉ. मृणालिनी फडणवीस, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान एम. तडवी, जिल्हा मृदा तपासणी आणि मृदा सर्वेक्षण अधिकारी श्री. अभिनव के. माळी, तसेच कृषी विज्ञान केंद्राचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हेमंत बाहेती उपस्थित होते. यावेळी डॉ. शमा सराफ, डॉ. योगेश मोरे, हर्षदा देसले, स्नेहल येउलकर, संदीप रोकडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा अडावदकर यांनी केले, तर आभार सोनाल उपलवार यांनी मानले.