
लोकशाही विशेष लेख
राज्यात सूर्य नारायणाने आपला प्रकोप दाखवायला सुरुवात केली आहे. सध्या राज्यात प्रचंड उकाडा जाणवत असुन जवळपास सर्वच शहरांचे तापमान ४० अंशाच्या पुढे गेले आहे. मागील आठवड्यापासून तर राज्यात प्रचंड उकाडा जाणवत आहे. विदर्भ, मराठवाड्यासह संपूर्ण राज्य उकाड्याने हैराण झाले आहे. या महिन्याअखेर राज्यातील तापमान उच्चांकी अंशावर पोहचेल असा अंदाज आहे. यावर्षी उन्हाळा कडक असेल असा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला होता तो खरा ठरताना दिसत आहे. मागील महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यातच याची चाहूल लागली होती गेल्या महिन्यातही सर्वच शहरांचे तापमान वाढले होते. मे महिन्यात तर तापमान उच्चांक गाठत आहे म्हणूनच मे महिना जनतेसाठी जिकारीचा ठरत आहे.
या महिन्यात कमाल तापमानाने उच्चांक गाठला आहे. विदर्भात तर उष्णतेची लाट आली आहे. विदर्भातील काही शहरांचे तापमान ४५ अंशाच्या पुढे गेले आहे. पारा ४५ अंशाच्या घरात गेल्याने नागरिकांची अक्षरशः होरपळ होत आहे. विदर्भासह राज्यातील काही भागात उष्णतेच्या प्रचंड लाटा वाहत आहेत. कोरडे व उष्ण वारे आणि वातावरणातील आर्द्रतेचे घटलेले प्रमाण यामुळे या उष्णतेच्या लाटा आल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. तापमानाचा पारा वाढत असल्याने उन्हाचा त्रास होऊन उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. राज्यात उष्माघाताने काहींचा बळीही गेला आहे.
सध्या राज्यात उष्माघाताचे १६४ रुग्णांची नोंद झाली आहे. अर्थात ही संख्या फक्त सरकारी दप्तरी नोंद झालेल्या रुग्णांची आहे. नोंद न झालेले शेकडो उष्माघाताचे रुग्ण राज्यात आहेत. राज्यातील वाढते तापमान आणि वाढते उष्माघाताचे रुग्ण पाहता सरकारने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे तो योग्यही आहे असे असले तरी आवश्यक कामासाठी, लग्न, देवधर्म कार्यासाठी लोकांना घराबाहेर पडावेच लागते. ग्रामीण भागात कुलदैवतांच्या यात्रा सुरू झाल्यात. कंदुरीचे कार्यक्रम ठिकठिकाणी सुरू आहेत. सण समारंभ साजरे करण्यासाठी, ग्राम दैवतांचे दर्शन घेण्यासाठी, नातेवाईकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी लोकांची धावपळ सुरू आहे त्यामुळे उन्हापासून बचाव करण्याची कसरत नागरिकांना करावी लागत आहे.
उन्हाळा सुरू झाला की नागरिकांना आरोग्याच्या तक्रारी जाणवू लागतात. उन्हाच्या झळा वाढल्या की थकवा येणे, चक्कर येणे, हातापायाला गोळे येणे, उष्माघात आणि मृत्यू असे परिमाण माणसांमध्ये दिसून येतात. काहींना डोळ्याचे तर काहींना त्वचेचे विकार जडतात. उन्हाळ्यात विविध प्रकारचे श्वसन विषयक, मेंदूचे आणि हृदयाचे आजार होतात. उन्हाळ्यात मधुमेहासारख्या व्याधी असणाऱ्या व्यक्तींनी विशेष खबरदारी घ्यायला हवी. उन्हाळ्यात उष्माघात होण्याचे प्रमाण खूप वाढते. उष्माघातामुळे शरीराचे तापमान उच्च पातळीवर पोहचते. योग्य आणि वेळेत उपचार न मिळाल्यास संबंधित व्यक्ती दगावण्याची शक्यता देखील असते. उष्माघातापासून वाचण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावेच.
दुपारी बारा ते चार यावेळेत घराबाहेर पडूच नये. काही महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे. घराबाहेर पडताना, टोपी, गॉगल, बूट, चपलांचा वापर करावा. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कापडे परिधान करावेत. उन्हात काम करत असलेल्या व्यक्तींनी टोपी, छत्री, गॉगल यांचा नियमित वापर करावा. तापमान वाढले की शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे डिहायड्रेशन होते. डिहायड्रेशन झाले की शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते त्यामुळे चक्कर येते. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ नये म्हणून सतत पाणी पित रहावे. शरीरात दररोज किमान दोन लिटर पाणी जाणे गरजेचे असते. घराच्या बाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत घ्यायला विसरू नका. साध्या पाण्यासोबत नारळपाणी, भाज्या व फळांचे रस दररोज प्याले तरी हरकत नाही. उन्हाळ्यात आरोग्य बिघडतेच म्हणून प्रत्येकाने उन्हाळ्यात आपले आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे. खबरदारी घेऊनच आपण उन्हाच्या तीव्रतेपासून बचाव करू शकतो.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
मो. ९९२२५४६२९५

