लोकशाही संपादकीय लेख
जळगावच्या राजकीय वास्तवाला अचूक स्पर्श करणारे ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन यांनी बुधवारी जळगावकरांना दिलेला संदेश एका अनुभवी राजकारण्याची खंत नाही, तर संपूर्ण शहराच्या स्थितीचे वस्तुनिष्ठ चित्र आहे. विकास, सेवा आणि समर्पण यांच्या आधारावर उभे राहिलेले जळगाव आज ज्या वळणावर येऊन ठेपले आहे, ते निश्चितच चिंताजनक आहे. पूर्वीची जिद्द, लढाऊ वृत्ती, काम करण्याची तळमळ या सर्वांचा राजकारणातून लोप होत चालला आहे. त्याजागी सुड, कपट, भय आणि व्यक्तिगत स्वार्थ यांचे सावट घोंघावत आहे. यामुळे विकासाच्या गाडीला लागलेला अडथळा दिवसेंदिवस अधिक मोठा होत चालला आहे.
माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी व्यक्त केलेली पहिली मोठी खंत म्हणजे शहराच्या विकासाला गेले 20-25 वर्षे पडलेली खीळ. ही केवळ त्यांची वैयक्तिक मते नाहीत; जळगावकरांच्या दैनंदिन अनुभवात ही स्थिती प्रकर्षाने दिसते. पाण्याची टंचाई, रस्त्यांची दुर्दशा, व्यापारी संकुलातील प्रलंबित कामे, वाढती गुन्हेगारीही या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. महत्त्वाचे म्हणजे, दादांनी उल्लेख केलेली 24 तास शुद्ध पाणीपुरवठा योजना त्यांच्या काळात तयार झाली होती, परंतु पुढील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने हे शहराच्या विकासदृष्टिकोनातील गंभीर पोकळी दर्शवत आहे.
आजच्या राजकारणात गुंड, माफिया, भ्रष्ट घटकांचा वाढता हस्तक्षेप ही दुसरी मोठी समस्या. दादा स्पष्ट सांगतात की, अशा लोकांचा उद्देश सेवा नसून स्वार्थी हितसंबंध साधणे हा असतो. ज्यांच्या हातात सत्ता जाते तेव्हा प्रशासनाची दोरी ढिली पडते, कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होतो आणि सर्वसामान्य नागरिकाला मूलभूत सुविधांसाठी धावाधाव करावी लागते. भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी यांचा संगनमत वाढले तर कोणतीही प्रामाणिक योजना अंमलात येणे अशक्य होते.
जळगावच्या पुढील राजकारणात कोणाला पुढे आणायचे हा प्रश्न आता अत्यंत निर्णायक बनला आहे. दादा म्हणतात तसे, सेवाभावी लोकांना पाठींबा देणे हेच कोणत्याही शहराच्या प्रगतीचे पहिले पाऊल असते. जळगावच्या आगामी महापालिका निवडणुकीत ही बाब अधिक महत्त्वाची ठरणार आहे. जुन्या संघर्षशील पिढीची कमतरता भासत असताना नवीन पिढी समर्पित होऊन काम करेल का? हा प्रश्न नागरिकांच्या मनात आहेच. माजी महापौर नितीन लढ्ढा यांना दिलेला दादांचा सल्लाही तितकाच महत्त्वाचा आहे. ‘निवडणूक लढवायची असल्यास वेगळा निर्णय घेऊन मैदानात उतरा’ या वाक्यांच्या ओळींतून सध्याच्या राजकीय वातावरणातील गुंतागुंत आणि दबाव यांचा अंदाज येतो. दादांचे निरीक्षण असे आहे की, आजचे राजकारण हे दडपशाही, सूड आणि कपटाचे झाले आहे. काम करणाऱ्यांना अडचणीत आणले जाते. हा बदल केवळ जळगावपुरता मर्यादित नाही; परंतु जळगावसारख्या वाढत्या शहरात हा बदल अधिक तीव्रतेने जाणवतो. ही परिस्थिती बदलायची असेल, तर नागरिकांनी आता आपल्या मतदानाची दिशा पुन्हा विचारात घेणे अत्यावश्यक आहे. दादांनी सुचविल्याप्रमाणे, चांगल्या, प्रामाणिक आणि सेवाभावी लोकांच्या हातात सत्ता देणे ही काळाची गरज आहे. लोकशाहीतील सर्वात शक्तिशाली घटक म्हणजे सामान्य नागरिक. त्यांनी योग्य नेतृत्वाची निवड केली तर विकासाची गती पुन्हा वाढू शकते.
जळगावला आता धोरणात्मक दृष्टीकोन, प्रामाणिक प्रशासन आणि दृढ इच्छाशक्ती असलेले नेतृत्व हवे आहे. शहराची वाढती लोकसंख्या, व्यापारी महत्त्व, औद्योगिक संधी या सर्वांचा योग्य उपयोग झाला तरी जळगाव महाराष्ट्रातील आदर्श शहरांमध्ये गणले जाऊ शकते. परंतु त्यासाठी भ्रष्टाचारविरहित, पारदर्शक आणि विकासाभिमुख सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत. आज जळगाव एका वळणावर उभे आहे. पुढचा मार्ग जळगावकरांनाच निवडायचा आहे. सुरेशदादा जैन यांचे आवाहन हे केवळ एका ज्येष्ठ नेत्याचा सल्ला नसून संपूर्ण शहराला जागृत करणारा इशारा आहे. त्यांच्या अनुभवानुसार, जिद्द आणि सेवा हीच राजकारणाची खरी ओळख. ती परत आली तर विकासाची वाट पुन्हा प्रशस्त होईल. आगामी महापालिका निवडणुकीत जळगावकर कोणत्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात, कोणत्या विचारांना पाठींबा देतात आणि कोणत्या मूल्यांना प्राधान्य देतात हे पाहणे नक्कीच उत्सुकतेचे ठरणार आहे. जळगावचा विकास हा फक्त निवडणुकीचा मुद्दा नसून शहराच्या भविष्यासाठीची सर्वात महत्त्वाची गरज आहे. नागरिकांनी आता सजग होऊन या विकासमूल्यांना केंद्रस्थानी ठेवले, तर बदल निश्चित घडेल ही अपेक्षा!