मुंबई
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु असताना महायुतीचा घटक असलेला अजित पवार गट आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत चांगलीच जुंपल्याचे दिसत आहे. राज ठाकरे यांनी अलीकडेच जाहीर सभेत अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अजित पवारांचा नाही, तो शरद पवारांचा आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. या टीकेला अजित पवार यांनीही प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर आता अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी मनसेवर बोचऱ्या भाषेत टीका केली आहे. मनसे हा मरण येत नाही म्हणून जिवंत असलेला पक्ष असल्याचे त्यांनी म्हटले.
सुरज चव्हाण यांनी मनसेवर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली. त्यांनी म्हटले की, मनसेचे सामाजिक क्षेत्रात काम करणारे अनेक पदाधिकारी आहेत. जनमतापेक्षा त्यांच्यावर किती गुन्हे आहेत, ते किती हप्तेवसुली गोळा करु शकतात, असे अट्टल गुन्हेगार टाईप पदाधिकारी असतात. तशा पदाधिकाऱ्यांची संख्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जास्त आहे. संस्कारांची कमी असल्यामुळे अनेक वक्तव्य करुन प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात किंवा आम्ही जिवंत आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केला जातो, असे सुरज चव्हाण यांनी म्हटले.
अमोल मिटकरी यांच्याबाबत अनेकजण धमक्या देतात. त्यांना मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की, वेळ, तारीख आणि काळ त्यांनी सांगावा, आम्ही पाहिजे तिथे येऊ. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्ष काय आहे ते आम्ही तुम्हाला दाखवून देऊ, असे सुरज चव्हाण यांनी ठणकावून सांगितले.