गृहमंत्रीजी, माझी पोलीस सुरक्षा तातडीने हटवा !

जनतेसाठी नियुक्त करा : सुप्रिया सुळेंचा मोठा निर्णय

0

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क

बदलापूरमधील दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. माझ्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेली पोलीस सुरक्षा तातडीने काढून घ्यावी, माझ्या सुरक्षेसाठी दिलेले हे पोलीस अधिकारी जनतेच्या सुरक्षेसाठी नियुक्त करावेत, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. सुप्रिया सुळेंनी ‘एक्स’च्या माध्यमातून ही विनंती केली आहे.

बदलापुरातील घटनेनंत संतप्त जनतेने काल रेल्वे रुळांवरुन उतरुन दिवसभर आंदोलन छेडत रेल्वेमार्ग रोखून धरला होता.  महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गेली काही महिन्यांपासून अतिशय गंभीर आहे. जनता असुरक्षित वातावरणात जगत असून सततच्या अप्रिय घटनांमुळे नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण आहे. महिला, अबालवृद्ध कुणीही सुरक्षित नाहीत. गुन्हेगार निर्ढावले असून कायद्याचा धाक उरलेला नाही. यंत्रणा राबविताना पोलीस यंत्रणेवर प्रचंड मोठा ताण पडतोय, हे स्पष्टपणे दिसत आहे. असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. दुसरीकडे माझ्यासह अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी मोठी पोलीस यंत्रणा काम करत आहे. परंतु एका बाजूला कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस यंत्रणेचे बळ कमी पडत असताना दुसरीकडे हि सुरक्षा घेणे योग्य नाही. म्हणून गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की कृपया माझ्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेली पोलीस सुरक्षा तातडीने काढून घ्यावी. माझ्या सुरक्षेसाठी दिलेले हे पोलीस अधिकारी जनतेच्या सुरक्षेसाठी नियुक्त करावेत. अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

 

गृहमंत्र्यानी निर्णय घ्यावा

यासोबतच राज्यातील ज्यांना ज्यांना सुरक्षा व्यवस्था दिली आहे त्या सर्वांच्या सुरक्षेच्या गरजेबाबत तातडीने आढावा घ्यावा व ज्यांना गरज नाही, त्यांची सुरक्षा काढून ते पोलीस कर्मचारी जनतेच्या सुरक्षेसाठी देण्यात यावे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था चोख राहावी व जनतेला सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी गृहमंत्र्यांनी हा निर्णय तातडीने घ्यावा ही नम्र विनंती; असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.