लोकशाही संपादकीय लेख
पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतून बाहेर पडून आपण ‘एकला चलो रे..’ची भूमिका घेऊन स्वतंत्रपणे सर्व उमेदवार उभे करण्याचा निर्णय महाराष्ट्रात सर्वात आधी जाहीर करून जिल्ह्यासह महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली. पुणे येथे जैन बोर्डिंगच्या जागे प्रकरणी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात शिवसेनेचे नेते माजी आमदार धनगेकर यांनी मोहोळ यांच्या विरोधात जोरदार आवाज उठवला असून मोहोळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहोळ यांना कानमंत्र दिला आहे, की एक तर मंत्रिपद अथवा जैन बोर्डिंगची जागा.. एकाबाबत मोहोळ यांनी त्याग करावा.. असे धनगेकर जाहीरपणे सांगत आहेत. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीत मिठाचा खडा पडायला नको, असा इशारा धनगेकरांना दिल्याचे जाहीर झाले.
सांगायचे तात्पर्य, पुणे येथील धनगेकरांच्या भूमिकेमुळे महायुतीत फूट पडायला नको याची चिंता करतात, तर त्यांचाच एक शिलेदार पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी महायुतीच्या शिवसेना भाजपच्या विरुद्ध स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर करून, हा निर्णय माझ्या एकट्याचा असल्याचे जाहीर केले. त्याबाबत एकनाथ शिंदे गप्प आहेत. याचे मात्र आश्चर्य वाटते. आता जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मात्र आज समर्थन करून भाजपवर हल्लाबोल केला.
युतीच्या संदर्भात जी नियमावली आहे, त्या नियमावलीचे पालन भाजप करत नाही. प्रत्येक विधानसभा निवडणुकीत भाजपतर्फे युती असताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून किशोर पाटलांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी लढवली. यांनी अपक्ष उमेदवारी लढवली. त्या पुन्हा भाजपात प्रवेश देऊन त्यांना पद दिले. एवढेच नव्हे तर प्रत्येक वेळेला ज्यांनी ज्यांनी किशोर पाटलांच्या विरोधात निवडणुका लढवल्या, त्यांना भाजपात प्रवेश दिला. विशेषतः म्हणजे किशोर आप्पांची सख्खी चुलत बहीण हिलादेखील भाजपात प्रवेश दिला. त्यामुळे किशोर आप्पांची चूक काय? त्यांचे विरोधात तुम्ही भाजपची फळी मजबूत करायची; मग त्यांनी गप्प का राहावे? हा प्रश्न गुलाबराव पाटलांनी व्यक्त करून भाजपला धक्का दिला आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे जरी बोलले नसले, तरी त्यांचे वतीने गुलाबराव पाटील बोलून गेले. एक प्रकारे शिंदे यांची व्यथा त्यांनी व्यक्त केली, हे खरे आहे. आमदार किशोर पाटलांच्या भूमिकेचे पालकमंत्र्यांनी समर्थन केले आहे. म्हणजे जिल्ह्यात महायुतीतील शिवसेना-भाजप युतीमध्ये फुटीची नांदीच म्हणावी लागेल. महायुतीतील भाजपवर दबाव टाकण्यासाठी ही शिंदे शिवसेनेने घेतलेली भूमिका आहे, असे म्हटले जाते. त्यांना महायुतीतून बाहेर पडायचे नाही. याचा अर्थ सत्तेतून त्यांना बाहेर पडायचे नाही. म्हणून हे दबाव तंत्र वापरला जातो आहे, असे म्हटले जाते आहे.
महायुती आणि शिंदे शिवसेना यांची युतीची भूमिका शिंदे यांच्या शिवसेनेला तोडायची नाही, परंतु पाचोराचे आमदार किशोर पाटील यांना जे ‘एकला चलो रे’ ची भूमिका जाहीर केली, त्या भूमिकेचे मात्र सर्वत्र स्वागत होत आहे. ‘ताकाला जायचे आणि लोटा लपवायचा’ हा प्रकार मला मान्य नाही. छुपेपणाने युतीच्या नावाखाली पाठित खंजीर खुपसण्यापेक्षा स्पष्टपणे समोरासमोर वार केलेले काय वाईट? ‘दूध का दूध पाणी का पाणी’ होऊ दे असेच जर आमदार किशोर पाटील म्हणत असतील, तर त्यात चूक काय? त्यामुळे अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी पाचोरा भडगाव तालुक्यातील नगरपरिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार किशोर पाटील जाहीर करीत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याआधी महाराष्ट्र स्तरावर मतदार यादीच्या घोळाबाबत मोठा वाद सुरू आहे. त्यामुळे जरी सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक 31 जानेवारी 2026 च्या आत घेण्याचे आदेश दिले असले, तरी पारदर्शक यादीच्या मागणीवरून या निवडणुका पुढे ढकळण्याचीच दाट शक्यता व्यक्त होत आहे. आणि त्या पुढे ढकलल्या तर ते भाजपलाही हवे आहे..!