भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर परतणार
नवी दिल्ली वृत्तसंस्था
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर तब्बल 280 दिवसांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) अडकले आहेत. केवळ आठ दिवसांसाठी नियोजित असलेल्या त्यांच्या मिशनमध्ये तांत्रिक अडचणींमुळे वारंवार विलंब होत आहे, त्यामुळे त्यांचे पृथ्वीवर परतणे लांबणीवर पडले आहे.नासाने दिलेल्या माहितीनुसार, क्रू-10 मिशन शुक्रवारी रात्री ७:०३ वाजता म्हणजेच शनिवारी पहाटे ४:३० वाजता प्रक्षेपित केले जाणार आहे. या मोहिमेद्वारे विल्यम्स आणि विल्मोर यांना पृथ्वीवर परत आणले जाईल.

नासा आणि स्पेसएक्स यांनी क्रू-10 मिशनच्या माध्यमातून या अंतराळवीरांना सुरक्षितपणे परत आणण्याची योजना आखली होती. मात्र, 13 मार्च 2025 रोजी सायंकाळी 7:03 वाजता नियोजित फाल्कन-9 रॉकेटचे प्रक्षेपण तांत्रिक बिघाडामुळे शेवटच्या क्षणी थांबवावे लागले. त्यामुळे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या परतीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
अंतराळ स्थानकात दीर्घकाळ राहिल्यामुळे या अंतराळवीरांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. वजनहीन अवस्थेमुळे स्नायूंची कमजोरी, हाडांची घनता कमी होणे आणि इतर शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणूनच त्यांना लवकरात लवकर पृथ्वीवर परत आणणे अत्यंत गरजेचे आहे.
या मिशनबाबत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि स्पेसएक्सचे संस्थापक एलॉन मस्क यांनीही विशेष रस घेतला आहे. त्यांच्या हस्तक्षेपामुळे क्रू-10 मिशन दोन आठवडे आधीच प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे हे प्रक्षेपण यशस्वी होऊ शकले नाही.
सध्या नासा आणि स्पेसएक्स नवीन प्रक्षेपणाची तारीख निश्चित करण्याच्या प्रयत्नात आहेत. प्रक्षेपण यशस्वी झाल्यास, हे दोघे २० मार्चनंतर अंतराळ स्थानकातून पृथ्वीवर निघतील. त्याच वेळी, एक नवीन टीम आयएसएसमध्ये पाठवली जाणार आहे. या टीममध्ये नासाच्या अॅनी मॅकलेन आणि निकोल आयर्स, जपानच्या ताकुया ओनिशी आणि रशियाच्या किरिल पेस्कोव्ह यांचा समावेश असेल.
क्रू-10 मिशनसाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि स्पेसएक्सचे मालक एलॉन मस्क यांनी दबाव टाकल्याची चर्चा सुरू आहे. याआधीच ही मोहीम दोन आठवडे आधी सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.


