पॅरिस : पृथ्वीचा नाश कधी आणि कसा होणार? हा प्रश्न कायम चर्चेत राहतो. याच चर्चेला शास्त्रज्ञांनी केलेल्या एका खळबळजनक दाव्यामुळे जोर मिळाला आहे. मानवजातीवर पुढील मोठी आपत्ती ही सूर्यामुळे ओढावण्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली असून पृथ्वीचा शेवट सौर वादळामुळे होण्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
पृथ्वीच्या शेवटाविषयी कधी पूर आल्याने जगबुडीच्या चर्चा उठतात तर कधी आकाशातून उल्का आदळून डायनासोरप्रमाणे पृथ्वीवरून मानवजातही नष्ट होईल किंवा हवेतून पसरणारा विषाणू मानवाला आतून
नष्ट करेल, अशी भीती व्यक्ती केली जाते. या पार्श्वभूमीवर शास्त्रज्ञांनी पृथ्वीचा शेवट सौर वादळामुळे होऊन मानवजातीपुढील सर्वात मोठी आपत्ती उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली आहे. शास्त्रज्ञांना सुमारे १४ हजार ३०० वर्षांपूर्वी पृथ्वीवर आलेल्या एका भयानक वादळाचे पुरावे मिळाले असून फ्रेंच आल्प्समधील ड्रोझेट नदीच्या काठावर सापडलेल्या झाडाच्या अवशेषांवरून असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या झाडात रेडिओकार्बन आढळून आले असून ते सौर वादळाच्या वेळी सूर्याने सोडलेला कार्बन प्रमाणेच असल्याचा अंदाज आहे. १८५९ मध्ये असेच भू-चुंबकीय वादळात
रात्रीच्या वेळी अचानक तेजस्वी ध्रुवीय प्रकाश निर्माण होऊन पक्षीही सूर्य उगवल्यासारखे किलबिलाट करू लागले होते. या अठराशेच्या उत्तरार्धात उठलेल्या वादळापेक्षा १४ हजार वर्षांपूर्वीचे सौर वादळ दहा पटीहून अधिक शक्तिशाली होते. त्यामुळे आज जर तसे सौर वादळ पृथ्वीवर आदळले तर त्याचा परिणाम खूपच विनाशकारी असेल. अशा वादळामुळे संपूर्ण जग अंधारात जाण्याची भीती फ्रान्समधील महाविद्यालय आणि युरोपीयन संशोधन संस्था सीईआरईजीई या युरोपीयन संशोधन केंद्रातील हवामान आणि महासागर उत्क्रांतीचे प्रा. एडवर्ड बार्ड यांनी व्यक्त केली आहे.

