कुठे चालली तरुण पिढी ? : त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या..!

0

लोकशाही संपादकीय लेख 

 

महाविद्यालयामध्ये विशेषतः वैद्यकीय महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या रॅगिंगमुळे एखादा विद्यार्थी त्याला बळी पडल्याच्या घटना आपण ऐकल्या पाहिल्या आहेत. त्यानंतर रॅगिंग विरोधात कडक कारवाई केल्यामुळे अलीकडे रॅगिंगचे प्रकारावर नियंत्रण आले आहे. ही चांगली गोष्ट म्हणता येईल. तथापि खेडेगावातील टारगट तरुण मुलांकडून एका तरुणाचा मानसिक, शारीरिक छळ होत असल्यामुळे त्या २१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भडगाव तालुक्यातील निंभोरा येथे नुकतीच घडली.

कल्पेश विकास पाटील (वय २१) असे या मुलाचे नाव असून निंभोरा येथील या तरुणाने गावातील ७ तरुणांच्या त्रासाला कंटाळून चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथील आपल्या मावशीच्या गावाला जाऊन २१ जानेवारी रोजी आत्महत्या केली. चाळीसगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून हा गुन्हा भडगाव पोलीस स्टेशनला वर्ग केला आहे. भडगाव पोलिसात मयत कल्पेशचे वडील विकास पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून निंभोऱ्यातील ७ तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना २२ जानेवारीला न्यायालयात हजर केले असता त्यातील ३ तरुणांना पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. दरम्यान एका तरुणीसह चार जण अद्याप फरार आहेत.

आरोपी तरुणांची नावे देवेंद्र गोरखनाथ पाटील, कुणाल अनिल पाटील, अनिल बापू पाटील, आशा अनिल पाटील, समाधान मुरलीधर पाटील, विशाल प्रमोद पाटील, विशाल पोपट पाटील, सर्व राहणार निंभोरा, तालुका भडगाव अशी आहेत. ७ तरुण आरोपींमध्ये एक तरुणी सुद्धा आहे, हे विशेष होय. हा प्रकार भडगाव तालुक्यातील दापोरा सारख्या खेड्यात होतो, त्यामागचा शोध आणि बोध घेण्याची गरज आहे. मोबाईल आणि दूरदर्शनमुळे तरुण पिढीवर परिणाम होत आहे. रिकामटेकड्या तरुणाईवर कसा परिणाम होतोय आणि तरुणाई बरबाद होते याचे हे एक उदाहरण म्हणता येईल. खेडेगावातील तरुणांनी एकत्र येऊन एका तरुणाचा मानसिक शारीरिक छळ करण्यामागचे कारण काय? बरे, आत्महत्या केलेल्या तरुणाची आर्थिक परिस्थिती जेमतेमच होती. परंतु या टारगट तरुणांच्या त्रासाला तो बळी पडला. मोठमोठ्या शहरांमध्ये उच्चभ्रू समाजातील तरुण-तरुणी असे खुशाल मार्ग अवलंबतात आणि शहरात अशा घटना घडतात असा समज होता. परंतु खेडेगावात सुद्धा हे लोन पसरले आहे. असे असल्याने ही चिंतादायक बाब म्हणावी लागेल. विचारवंतांनी याबाबत अभ्यास करून याबाबतचा निष्कर्ष काढण्याची गरज आहे.

तरुणांच्या हाताला काम नसल्याने बेरोजगार तरुण दिशाहीन बनलेला आहे. ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण माथेफिरू सारखे कृत्य करीत असतात. लहान लहान अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटना घडतच आहेत. हे एक त्या मागचे कारण म्हणता येईल. बेकार तरुणांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती लवकर रुजू होत आहे. ७ ते ८ वर्षाच्या बालिकेला गोड बोलून तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्याचा प्रकार अलीकडे सर्वत्र वाढत आहे. खेड्यातील तरुणांच्या टोळक्याकडून एका तरुणाला मानसिक शारीरिक त्रास देण्यात या टोळक्या तरुणांना कसला आनंद मिळाला असेल? हे समजण्यापलीकडचे आहे. तरुणाला नाहक त्रास देण्यात या तरुण टोळक्याला कसला आत्मिक आनंद मिळाला? हे त्या तरुण टोळक्यालाच माहीत. परंतु तरुणाई कोणत्या दिशेला जात आहे. या दिशा भरकटलेल्या तरुणांवर त्यांच्या आई-वडिलांकडून काही संस्कार झाले नाहीत का? त्याला जबाबदार कोण? जन्म देणारे आई-वडील की शाळा आणि महाविद्यालयात शिक्षण देणारे शिक्षक? की मोबाईल आणि टीव्हीवरील मुक्त प्रसारण? हा एक अभ्यासाचा विषय आहे.

परंतु भडगाव तालुक्यातील निंभोरा येथील २१ वर्षीय तरुण कल्पेश विकास पाटील यांनी मात्र आपल्या प्राणाचा बळी दिला, हे मात्र खरे. तरुण-टोळक्याच्या त्रासाला मयत कल्पेश सहन करू शकला नाही. परंतु त्याने आत्महत्येसारखी टोकाची भूमिका न घेता या तरुणांच्या गैरवर्तनाचा सामना करणे आवश्यक होते. त्याने तरुण टोळक्याकडून त्रास होत असल्याची माहिती आपल्या आई-वडिलांना तसेच गावातील वरिष्ठांना द्यायला हवी होती. या तरुण टोक्याच्या कुटुंबीयांना या घटनेमुळे निश्चित वाईट वाटणार आहे. परंतु तरुणाईच्या अभ्यासकांना हा एक विषय मिळाला आहे. त्यावर अभ्यास करून त्याचा निष्कर्ष काढणे अत्यंत गरजेचे आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.