आडगाव येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
घरात कोणी नसताना टोकाचा निर्णय; परिसरात हळहळ
पारोळा प्रतिनिधी : पारोळा तालुक्यातील आडगाव–गडगाव येथे एका ३१ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. अमोल बन्सीलाल पाटील (वय ३१, रा. आडगाव–गडगाव, ता. पारोळा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २५ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास घरात कोणीही नसताना अमोल पाटील याने राहत्या घरातील स्लॅबच्या कडीला नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. बराच वेळ झाला तरी अमोल बाहेर न आल्याने संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर घरात डोकावून पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांसह नातेवाईकांनी अमोल पाटील याला तातडीने खाजगी वाहनाने पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून, याप्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तरुणाने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय का घेतला, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. एका तरुणाचा अचानक झालेला मृत्यू आणि त्यामागील अनुत्तरित प्रश्नांमुळे आडगाव–गडगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

