आईसोबत किरकोळ वाद; तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
हरिविठ्ठल नगरात घडली हृदयद्रावक घटना
जळगाव प्रतिनिधी हरिविठ्ठल नगरातील २५ वर्षीय संदीप बापू पाटील या तरुणाने आईसोबत किरकोळ वाद झाल्यानंतर रागाच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. दुपारी सुमारे ३ वाजता ही घटना समोर आली असून, रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संदीप पाटील हा आपल्या आई संगीता पाटील यांच्यासह वास्तव्यास होता. मजुरी करून घरखर्चाला हातभार लावणाऱ्या संदीपच्या वडिलांचे वर्षभरापूर्वी निधन झाले होते. सोमवारी घरी असताना किरकोळ कारणावरून त्याचा आईसोबत वाद झाला. या वादानंतर संदीप रागाने घरातील खोलीत गेला, तर संगीता पाटील काहीकाळासाठी घराबाहेर गेल्या.
नंतर त्या घरी परतल्यानंतरही खोली आतून बंदच असल्याने त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला असता संदीपने गळफास घेतल्याचे दिसून आले. तातडीने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून मृताच्या पश्चात आई आणि मोठी बहिण असा परिवार आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

